मुंबई : मुलुंडमधील एलबीएस मार्गावर ‘वडाळा – ठाणे – कासारवडवली मेट्रो ४’ मार्गिकेच्या कामादरम्यान मेट्रोच्या खांबांवरील अंदाजे अडीच मेट्रिक टनाचा सिमेंटचा कठडा (पॅरापेट) कोसळून झालेल्या अपघाताप्रकरणी कंत्राटदार कंपनीच्या दोन अधिकाऱ्यांसह एका प्रकल्प सल्लागाराला सत्र न्यायालयाने बुधवारी अटकपूर्व जामीन मंजूर केला.
या प्रकरणात अटकेची भीती असल्याने, मिलन रोड बिल्डटेक एलएलपीचे व्यवस्थापकीय भागीदार अल्पेश पटेल आणि तांत्रिक सल्लागार गणेश घोलप यांनी प्रकल्प सल्लागार टी. साई सुरेश कुमार यांच्यासह अटकपूर्व जामिनासाठी सत्र न्यायालयात धाव घेतली होती. प्रत्यक्ष जागेवरील कामात आपली कोणतीही थेट भूमिका नसल्याचे आणि आपल्याला या प्रकरणात गोवण्यात आल्याचा दावा त्यांनी अटकपूर्व जामिनाची मागणी करताना केला होता. अतिरिक्त सत्र न्यायाधीश एम. ओझा यांनी तिघांचेही अटकपूर्व जामिनासाठी केलेले अर्ज मंजूर करून त्यांना अटकेपासून दिलासा दिला.
दरम्यान, बांधकाम स्थळ पर्यवेक्षकाने वेल्डरला, अद्याप काँक्रीटीकरण न झालेल्या सिमेंटच्या कठड्यांना हात न लावण्याबाबत स्पष्ट सूचना दिल्या होत्या. मात्र, वेल्डरने या सूचनांकडे दुर्लक्ष केले, त्यामुळे पॅरापेट कोसळले. घटनेनंतर वेल्डर घटनास्थळावरून पळून गेला, असा दावा तिन्ही आरोपींनी अटकपूर्व जामीन अर्जात केला होता. त्यांचे प्रकल्प संचालक आणि इतर वरिष्ठ कर्मचारी पीडितांना मदत करण्यासाठी तात्काळ घटनास्थळी पोहोचले होते आणि त्यांनी पोलिसांच्या तपासात पूर्ण सहकार्य केले होते, असा कंपनीतर्फेही करण्यात आला. दुसरीकडे, बांधकाम स्थळावर सुरक्षाविषयक उपाययोजनांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी या दोघांवरच होती, असा दावा करून पोलिसांनी आरोपींच्या अटकपूर्व जामीन अर्जांना विरोध करताना केला.
