मुंबई: मेट्रो मार्ग – ४ प्रकल्पांतील मुलुंड अग्निशमन केंद्राजवळील मेट्रो व्हायाडक्टवर १३ फेब्रुवारी रोजी झालेल्या अपघाताप्रकरणी कंत्राटदाराला पाच कोटी तर सल्लागाराला १ कोटीचा दंड ठोठावण्यात आला आहे. शिवाय प्रकल्पाशी संबंधित प्राधिकरणातील तीन अभियांत्रिकी अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. मुलुंडमधील मेट्रो दुर्घटनेत वाहनावर कठडा तुटून झालेल्या दुर्घटनेत एकाचा मृत्यू तर तीन जण जखमी झाले होते. या दुर्घटनेला जबाबदार असणार्यांवर काय कारवाई केली याबाबत आमदार प्रसाद लाड यांनी विधान परिषदेत प्रश्न उपस्थित केला होता.

या दुर्घटनेस जबाबदार असणाऱ्या मे. डी. बी. इंजिनीअरिंग ॲण्ड कन्सल्टिंग, जीएमबीएच, हिल इंटरनॅशनल आयएनसी ॲण्ड लुईस बर्जर कन्सल्टिंग प्रा.लि. या सल्लागाराला कंपन्यांचे कंत्राट रद्द केले असून कंत्राट रद्द केल्यानंतर आयेशा आणि कन्सल्टिंग इंजीनिअर्स ग्रुप (सीईजी) या सल्लागाराची नियुक्ती करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली का? प्रा.लि. कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकले का, पुन्हा काम त्यांनाच दिले का असे प्रश्न त्यांनी मांडले.

याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या कारवाईची लेखी माहिती दिली. सदर प्रकल्पाचे काम ९० टक्के पूर्ण झाले असल्याने उर्वरित कामासाठी नवीन सल्लागार नेमणे योग्य ठरणार नसल्याने असणारी सल्लागार कंपनी मे. डी. बी. इंजिनीयरिंग अँड कन्सल्टिंग जीएमबीएच, हिल इंटरनॅशनल आयएनसी अॅड लुईस बर्जर कन्सल्टिंग प्रा. लि. यांनाच कामासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे, अशी माहिती लेखी उत्तरात देण्यात आली आहे.

गुन्हा दाखल:

या दुर्घटनेप्रकरणी मेट्रो मार्ग – ४ ची सुरक्षा तपासणीकरिता पाधिकरणाने समिती स्थापन केली होती. या समितीच्या अहवालानुसार प्रकल्पस्थळी आवश्यक सुरक्षा उपाययोजना करण्यात आल्या आहेत. तर दुर्घटनेला जबाबदार ठरल्याप्रकरणी संबंधितांवर पोलिसांत गुन्हाही दाखल करण्यात आला असल्याची माहिती लेखी उत्त्तरात देण्यात आली आहे.