मुंबई : मुलुंड येथील मुंबई महानगरपालिकेच्या श्रीमती मनसादेवी तुलसीराम अगरवाल (एम.टी. अगरवाल) सर्वसाधारण रुग्णालयात नवे रक्तशुद्धीकरण केंद्र सुरू करण्यात आले. यामुळे पूर्व उपनगर व ठाण्यातील मूत्रपिंडाच्या आजारांनी ग्रस्त रुग्णांना रक्तशुद्धीकरण सुविधा सहज उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. मुक्ता किडनी ॲंड डायलिसिस केंद्राच्या माध्यमातून ही सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता विभाग तसेच सांस्कृतिक कार्य विभागाचे मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या हस्ते रक्तशुद्धीकरण केंद्राचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी आमदार मिहिर कोटेचा, नगरसेवक प्रकाश गंगाधरे, नगरसेवक नील सोमय्या, माजी नगरसेविका समिधा कांबळे, उपायुक्त शरद उघडे, प्रमुख वैद्यकीय अधिक्षक डॉ. चंद्रकांत पवार, अगरवाल रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. राजुसिंग राठोड आदी उपस्थित होते.

रुग्णालयाच्या तिसऱ्या मजल्यावर उभारण्यात आलेल्या रक्तशुद्धीकरण केंद्रामध्ये १० खाटा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. हे केंद्र ”नागरी आरोग्य सहयोगाने’ अंतर्गत उभारण्यात आले असून, मुक्ता किडनी ॲंड डायलिसिस संस्थेच्या माध्यमातून याठिकाणी आरोग्य कर्मचारी वर्ग उपलब्ध करण्यात येणार आहेत. प्रतिदिन ५० रुग्णांसाठी विविध सत्रामध्ये रक्तशुद्धीकरण सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. आयुष्मान भारत व महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत प्रत्येक रुग्णासाठी या सुविधेचा लाभ ५ लाखांच्या वार्षिक मर्यादेपर्यंत घेता येईल. तसेच योजनेव्यतिरिक्त इतर रुग्णांसाठी अत्यल्प दरात ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

समाजातील कोणत्याही रूग्णाला जेव्हा कधी रक्तशुद्धीकरणाची गरज लागेल तेव्हा सहज, स्वस्त, योग्य उपचार सुविधा उपलब्ध व्हावी. रुग्णांची सेवा करण्याची संधी या पीपीपी तत्वावरील सेवेच्या माध्यमातून मिळाली असल्याचे त्यांनी सांगितले. मुलुंडवासीयांना आरोग्याच्या दृष्टीने ही दीपावलीच्या निमित्ताने भेट असल्याचे कोटेचा यांनी सांगितले.

दरम्यान, अगरवाल रुग्णालयाच्या नवीन इमारतीचे १४ डिसेंबर २०२५ रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे लोकार्पण करण्यात आले होते. सद्यस्थितीत उपलब्ध ११० रुग्णशय्यांसाठी सर्व आवश्यक आरोग्य सुविधा पुरवल्या जात आहेत. त्यात वैद्यकीय, शल्यचिकित्सा, अस्थिव्यंग, कान-नाक-घसा, नेत्र, बालरोग, त्वचाविकार, दंतरोग, रक्तदाब-मधुमेह, तसेच प्रयोगशाळा सेवा यांचा समावेश आहे. तसेच रुग्णालयात डीएनबी अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी आवश्यक तज्ज्ञ डॉक्टरांची नियुक्ती करण्यात येत आहे. येत्या सहा महिन्यांत सीटी स्कॅन, एमआरआय सेवा सुरू होणार आहे.