मुंबई : कंपनीच्या मालकाच्या नावाने बनावट संदेश पाठवून लेखापालाकडून दहा लाख रुपये उकळून सायबर फसवणूक करणाऱ्या आंतरराज्य टोळीला मुलुंड पोलिसांनी जेरबंद केले. या प्रकरणाच्या तपासात देशभरातील २१ राज्यांमध्ये नोंदवलेल्या २५५ सायबर तक्रारींशी संबंधित बँक खात्यांची माहिती समोर आली. या तक्रारींमधील कथित फसवणुकीची रक्कम सुमारे ७२ कोटी रुपये असल्याचा अंदाज आहे. या प्रकरणी सहा आरोपींना अटक करण्यात आली असून, साडेपाच लाख रुपये आणि गुन्ह्यात वापरलेले पाच मोबाइल जप्त करण्यात आले.

मुलुंड येथील एका खासगी कंपनीच्या मालकाच्या नावाने ३० जुलै २०२६ रोजी कंपनीच्या लेखापालाला अनोळखी क्रमांकावरून समाज माध्यमावर संदेश आला. संदेशावरील छायाचित्र मालकाचे असल्याने लेखापालाचा विश्वास बसला. त्यानंतर त्याने कंपनीच्या बँक खात्यातून वेगवेगळ्या टप्प्यांत दहा लाख रुपये पाठवले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्याने मुलुंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. या व्यवहारांमधील पैशांचा माग काढून टोळीतील अन्य सदस्य, खात्यांचे पुरवठादार आणि कथित लाभार्थी यांची ओळख पटवण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत.

आभासी चलनात पैशांचे रूपांतर

बँक व्यवहारांच्या तपासात साडेपाच लाख रुपये उत्तर प्रदेशातील मेरठ येथील खात्यात जमा झाल्याचे आढळले. या धाग्यावरून मेरठमधून तीन, गाझियाबाद आणि गुजरातमधील वडोदरा येथून प्रत्येकी एक, तर मुंबईतील कांदिवलीतून एका आरोपीला अटक करण्यात आली. आरोपींच्या मोबाइलमध्ये ६० बँक खात्यांची माहिती मिळाली.

त्यापैकी ११ खात्यांशी संबंधित १८२, तर अन्य ४९ खात्यांशी संबंधित ७३ सायबर तक्रारी असल्याचे तपासात समोर आले. आरोपी संदेशवहन गटांद्वारे बँक खाती आणि सिमकार्ड मिळवून फसवणुकीची रक्कम अनेक खात्यांत वळवत होते. नंतर ही रक्कम रोख काढली जात होती किंवा ‘यूएसडीटी’ या आभासी चलनात रूपांतरित केली जात होती.