मुंबई: उत्तर प्रदेशातून मुंबई येऊन एमटीएनएलच्या वायर चोरणाऱ्या नऊ जणांच्या टोळीला मुलुंड पोलिसांनी अटक केली. पोलिसांनी या आरोपींच्या ताब्यातून एक टेम्पो आणि चोरीसाठी वापरण्यात येणारी अवजारे जप्त केली.
गेल्या काही महिन्यांपासून मुंबई शहरात जमिनीखालून गेलेल्या एमटीएनएलच्या वायरची मोठ्या प्रमाणात चोरी होत होती. या प्रकरणी विविध पोलिस ठाण्यांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र आरोपी अद्याप पोलिसांच्या हाती लागत नव्हते. मुलुंड परिसरात अशाच प्रकारे एमटीएनएलच्या वायर चोरी करण्यासाठी एक आठ ते दहा जणांची टोळी उत्तर प्रदेशमधून येणार असल्याची माहिती मुलुंड पोलिसांना मिळाली. त्यानुसार मुलुंड पोलिसांनी सोमवारी रात्री मुलुंडच्या एलबीएस मार्गावर सापळा रचला होता.
मध्यरात्री १२ च्या सुमारास परिसरात एका टेम्पोमधून आठ ते दहा जण उतरले. आरोपी वायर चोरण्याच्या तयारीत असतानाच पोलिसांनी त्यांना घेराव घालून ताब्यात घेतले. नेहाल सय्यद (४८), एमरुल कुलिहा (२०), विक्राम अजहर (२१), अभिषेक महतो (२२), अहमद आलम (४०), मुर्शीद अन्सारी, (२९) राजा अन्सारी (३०), संजय महतो (३८), संजय कुमार शहा (४२) अशी या आरोपींची नावे असून यापैकी सहा आरोपी उत्तर प्रदेशमध्ये, तर दोन आरोपी बिहार आणि एक आरोपी दिल्ली येथील रहिवासी आहेत. पोलिसांनी आरोपींच्या ताब्यातून एका टेम्पोसह बारा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
