मुंबई: अंतरराष्ट्रीय बँकेकडून कर्ज मंजूर करून देण्याचे अमिष दाखवून अनेकांची फसवणूक करणाऱ्या एका अनधिकृत कॉल सेंटरवर मंगळवारी मुलुंड पोलिसांनी छापा घातला. पोलिसांनी कॉल सेंटर चालवणाऱ्या पाच जणांना अटक केली असून त्यांच्याकडून लॅपटॉप, मोबाइल आणि इतर साहित्य जप्त केले.
गेल्या काही दिवसांपासून मुलुंड कॉलनी परिसरात काहीजण बनावट कॉल सेंटरच्या माध्यमातून नागरिकांची फसवणूक करीत असल्याची माहिती मुलुंड पोलिसांना मिळाली. खात्री करून घेतल्यानंतर पोलिसांनी मंगळवारी या कॉल सेंटरवर छापा घातला. एका घरात अनधिकृतरित्या कॉल सेटर चालविण्यात येत असल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणी पोलिसांनी पाच जणांना ताब्यात घेतले. पोलिसांनी त्यांच्याकडून दोन लॅपटॉप, ११ मोबाइल, रोख रक्कम आणि इतर साहित्य जप्त केले.
आरोपी नागरिकांशी फोनवरून संपर्क साधून वा संदेश पाठवून अंतरराष्ट्रीय बँकेकडून कर्ज मिळवून देण्याचे आमिष दाखवत होते. कर्ज घेण्यासाठी एखाद्याने होकार देताच विविध शुल्कापोटी त्याच्याकडून मोठी रक्कम उकळण्यात येत होती. कर्ज मंजूर झाल्याची बनावट कागदपत्रेही त्यांना पाठवण्यात येत होती. आशा प्रकारे या आरोपींनी अनेकांची मोठ्या प्रमाणात फसवणूक केल्याचा संशय पोलिसांना आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.
