मुंबई : मुलुंड येथील मिठागरांच्या जागेवर धारावी पुनर्वसन प्रकल्पातील अपात्र रहिवाशांसाठी घरे बांधण्यास विरोध करण्याकरीता रविवार, ७ जून रोजी सकाळी मुलुंडकर आंदोलन करणार आहेत. गेल्या आठ – दहा दिवसांपासून मिठागर बचाव समितीने या आंदोलनाबाबत मुलुंडमध्ये मोठ्या प्रमाणावर जनजागृती केली. या आंदोलनाला मोठ्या प्रमाणावर मुलुंडकरांकडून प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे.

धारावी पुनर्वसन प्रकल्पातील विस्थापितांना मुलुंडमध्ये स्थलांतरित करण्याच्या निर्णयाला विरोध करण्यासाठी मुलुंडमधील नागरिकांनी एकत्र येऊन मिठागरे वाचवा समिती स्थापन केली आहे. या समितीच्या माध्यमातून रविवार, ७ जून रोजी सकाळी आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे.

मुलुंडमधील एक इंचही जमीन विस्थापितांसाठी दिली जाणार नाही, असे आश्वासन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुतीच्या नेत्यांनी दिले होते. मात्र मुलुंडमध्ये मोठ्या प्रमाणावर धारावी पुनर्वसन प्रकल्पातील अपात्र रहिवाशांसाठी वसाहत उभारण्याचे काम सुरू आहे. या निर्णयामुळे स्थानिक नागरिकांवर सामाजिक, आर्थिक व पायाभूत सुविधांवर मोठा ताण येणार आहे. त्यामुळे मुलुंडमधील मिठागरांच्या जागेवरील प्रस्तावित गृहनिर्माण आणि त्यातून उद््भवणाऱ्या पर्यावरणीय धोक्यांविरोधात आंदोलन उभारण्याचे ठरवले आहे.

गेल्या काही दिवसांपासून समितीच्यावतीने मुलुंड रेल्वे स्थानक परिसरात जनजागृती मोहीम राबविण्यात येत होती. त्याला मुलुंडकरांनी भरभरून प्रतिसाद दिल्याचे समितीच्यावतीने सत्यवान दळवी यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले की,मुलुंड पूर्व परिसरात मिठागरांच्या जागेवर झोपडी पुनर्वसनासाठी वसाहत उभारण्याचे काम सुरू असल्याची बाब अत्यंत चिंताजनक आहे. मुलुंड पूर्व हा परिसर आधीच लोकसंख्येच्या वाढत्या ताणाखाली आहे. पाणीपुरवठा, रस्ते, वाहतूक, शाळा, आरोग्य सुविधा या सर्व बाबी मर्यादित आहेत. अशा परिस्थितीत बाहेरील अपात्र लाभार्थ्यांसाठी येथे वसाहत बांधणे स्थानिकांवर अन्याय आहे. तसेच या निर्णयामुळे परिसरातील शांतता, सुरक्षा व्यवस्था व नागरिकांचे जीवनमान यावरही विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. ही बाब केवळ एका पक्षाची किंवा गटाची नसून संपूर्ण मुलुंडकरांच्या हिताची आहे. त्यामुळे सर्व राजकीय पक्ष, सामाजिक संस्था, व्यापारी संघटना, नागरिक संघटना व प्रतिष्ठित व्यक्तींनी परस्परांमधील मतभेद बाजूला ठेवून एकत्र येणे अत्यंत आवश्यक आहे, असे त्यांनी सांगितले.

मुलुंड पूर्व येथील मिठागरांच्या जागेवर प्रस्तावित गृह निर्माण प्रकल्प उभारण्यास स्थानिक नागरिकांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. या प्रकल्पामुळे पर्यावरणीय समतोल बिघडण्याची भीती व्यक्त केली जात असून, स्थानिक नागरिकांच्या हक्कांवर गदा येणार असल्याचा आरोप करण्यात येत आहे.