मुंबई : मुलुंडमधील मिठागरांच्या जागेवर गृहप्रकल्प उभा करण्यास मुलुंडकरांचा विरोध वाढू लागला आहे. पावसाला अद्याप सुरूवातही झालेली नसली तरी मिठागरांच्या जमिनीवर पाणी, दलदल आणि पक्ष्यांचा वावर आहे. मिठागराची जमीन पाणथळ असतानाही या जमिनीवर गृहप्रकल्प बांधण्याचा अट्टाहास कशासाठी करण्यात येत आहे, असा सवाल उपस्थित होऊ लागला आहे. जैवविविधतेने नटलेली ही मिठागराची जमीन बुजवून इथे गृहप्रकल्प का उभारायचा आहे, असा सवाल उपस्थित होऊ लागला आहे.
धारावीतील अपात्र रहिवाशांसाठी मुलुंडमधील मिठागरांच्या जागेवर गगनचुंबी इमारती बांधण्यात येणार आहेत. या प्रकल्पाविरोधात मुलुंडकरांनी आंदोलन केल्यानंतरही सरकारी यंत्रणेला काहीही फरक पडलेला नाही. त्यातच आता शिवसेना (ठाकरे) पक्षाचे कार्यकर्ते ॲड. सागर देवरे यांनी मिठागराच्या जमिनीची एक ध्वनीचित्रफित समाजमाध्यमांवर टाकली आहे. त्यात मिठागरांच्या जमिनीवर पाणी, दलदल आणि पक्षी दिसत आहेत. याबाबत ॲड. देवरे यांनी म्हटले आहे की,
मुंबईत अद्याप पावसाला सुरुवात झालेली नाही, मात्र मुलुंड, भांडुप, विक्रोळीच्या पट्ट्यातील मिठागरांच्या जमिनीवर आजही पाण्याचे अस्तित्व आहे. याचाच अर्थ आपली नैसर्गिक संपत्ती अजूनही अस्तित्वात आहे. या जमिनी नैसर्गिकदृष्ट्या महत्त्वाच्या नाहीत असे सांगितले जाते, ते चुकीचे आहे, असेही ॲड. देवरे म्हणाले.
केवळ काही उद्योग समूहांच्या फायद्यासाठी नैसर्गिक संपत्ती असलेल्या या मिठागरांच्या जागेवर भरणी केली जाणार आहे. ही जी पाणथळे आहेत. त्यावर भरणी करून चाळीस-चाळीस, पन्नास-पन्नास मजल्यांच्या इमारती उभ्या केल्या जाणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार येथे ५६ मजल्यांचे एक हॉटेलही बांधण्यात येणार असल्याचा आरोपही ॲड. देवरे यांनी केला.
धारावी प्रकल्पाला विरोध नाही
धारावी प्रकल्पाला आमचा कोणाचाच विरोध नाही. धारावीतील रहिवाशांना हक्काची घरे मिळालीच पाहिजेत. परंतु त्याची एवढी मोठी किंमत मुंबई, निसर्गाला मोजायला लागणार असेल तर ते चुकीचे आहे. ही घरे मिळताना आपल्या नैसर्गिक संपत्तीचे, इतर आजूबाजूच्या परिसराचे आपण नुकसान का करत आहोत ? असा सवाल ॲड. देवरे यांनी ध्वनिचित्रफितीच्या माध्यमातून विचारला आहे. पाणथळ जागेवर भरणी करून बांधकाम करण्याचा मनसुबा सरकारने बाजूला ठेवावा, अशीही विनंती त्यांनी केली आहे.
पावसाच्या पाण्याचा निचरा कसा होणार
दरम्यान, मुलुंड येथील मिठागरांच्या जागेवर गृहप्रकल्प उभा राहिल्यास येत्या काही वर्षात पावसाळ्यात मुलुंड पूर्वेतील सखल भागांमध्ये पूरस्थिती निर्माण होऊ शकते, अशी भीती मिठागर बचाव समितीने आंदोनलाच्या वेळी व्यक्त केली.मिठागरांची जमीन पावसाच्या पाण्याचा नैसर्गिक निचरा करणारी असल्याने मोठ्या प्रमाणात भराव टाकल्यास पूरस्थिती येऊ शकते. त्यामुळे स्वतंत्र संस्थेमार्फत या प्रकल्पाचे पर्यावरणीय लेखापरीक्षण करण्याची मागणी समितीने केली. याप्रकरणी समितीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सर्व प्राधिकरणांना पत्रही पाठवले आहे.
