मुंबई : मुलुंड येथील मिठागरांच्या जागेवर धारावी पुनर्वसन प्रकल्पातील अपात्र रहिवाशांसाठी घरे बांधण्यास विरोध करण्याकरता मुलुंडवासियांनी आंदोलन उभारण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत ७ जून रोजी आंदोलन करण्यात येणार असून लवकरच आंदोलनाची दिशा ठरवण्यात येणार आहे.धारावी पुनर्वसन प्रकल्पातील विस्थापितांना मुलुंडमध्ये स्थलांतरीत करण्याच्या निर्णयाला मुलुंडकरांनी विरोध केला होता. त्यानंतर मुलुंडमधील एक इंचही जमीन विस्थापितांसाठी दिली जाणार नाही, असे आश्वासन लोकसभा निवडणूकीच्या तोंडावर महायुतीच्या नेत्यांनी दिले होते.
मात्र, मुलुंडमध्ये मोठ्या प्रमाणावर धारावी पुनर्वसन प्रकल्पातील अपात्र रहिवाशांसाठी वसाहत उभारण्याचे काम सुरू आहे. या निर्णयामुळे स्थानिक नागरिकांच्या सामाजिक, आर्थिक व पायाभूत सुविधांवर मोठा ताण निर्माण होणार आहे. त्यामुळे मुलुंडमधील रहिवाशांनी मिठागरे वाचवा समिती स्थापन केली असून मुलुंडमधील मिठागरांच्या जागेवरील प्रस्तावित गृहनिर्माण आणि त्यातून उद्भवणाऱ्या पर्यावरणीय धोक्यांविरोधात आंदोलन उभारण्याचे ठरवले आहे.
याबाबत समितीच्यावतीने सत्यवान दळवी यांनी सांगितले की, मुलुंड पूर्व परिसरात मिठागरांच्या जागेवर झोपडी पुनर्वसनासाठी वसाहत उभारण्याचे काम सुरू असल्याची बाब अत्यंत चिंताजनक आहे. मुलुंड पूर्व हा परिसर आधीच लोकसंख्येच्या वाढत्या ताणाखाली आहे. पाणीपुरवठा, रस्ते, वाहतूक, शाळा, आरोग्य सुविधा या सर्व बाबी मर्यादित आहेत. अशा परिस्थितीत बाहेरील अपात्र लाभार्थ्यांना येथे वसाहत देणे हा स्थानिकांवर अन्याय आहे. तसेच, या निर्णयामुळे परिसरातील शांतता, सुरक्षाव्यवस्था व नागरिकांचे जीवनमान यावरही विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे.
ही बाब केवळ एका पक्षाची किंवा गटाची नसून संपूर्ण मुलुंडकरांच्या हिताची आहे. त्यामुळे सर्व राजकीय पक्ष, सामाजिक संस्था, व्यापारी संघटना, नागरिक संघटना व प्रतिष्ठित व्यक्तींनी आपले मतभेद बाजूला ठेवून एकत्र येणे अत्यंत आवश्यक आहे. म्हणून आंदोलन करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
या प्रकल्पाला ठाम विरोध करण्यासाठी , स्थानिक नागरिकांच्या हक्कांचे रक्षण करण्यासाठी, प्रशासनावर योग्य तो दबाव निर्माण करण्यासाठी शांततामय व लोकशाही मार्गाने सर्वपक्षीय आंदोलन उभारण्यात येणार असल्याचे दळवी यांनी सांगितले. याबाबत जास्तीत जास्त मुलुंडवासियांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. येत्या ७ जून रोजी वझे केळकर महाविद्यालय येथे हे आंदोलन होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
