मुंबई: मुलुंड पूर्वेकडील मिठागर परिसरातील प्रस्तावित गृहनिर्माण प्रकल्पाला विरोध करण्यासाठी मिठागर बचाव समितीने केलेल्या तक्रारीची व गेल्या रविवारी केलेल्या आंदोलनाची महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाने (एमसीझेडएमए) दखल घेतली आहे. या प्रकल्पामुळे उद्भवणाऱ्या पर्यावरणीय धोक्यांबाबत तपासणी करून आवश्यक ती चौकशी करण्याचे निर्देश मुंबई महापालिका, मिठागर उपायुक्त आणि वनविभागाच्या कांदळवन कक्षाला दिले आहेत.
मुलुंड पूर्व येथील मिठागरांच्या जागेवर धारावीतील प्रकल्पग्रस्तांसाठी बांधण्यात येणाऱ्या गृहनिर्माण प्रकल्पाविरोधात स्थानिक नागरिकांनी गेल्या रविवारी आंदोलन केले होते. मिठागर बचाव समितीच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनाला मुलुंडकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला होता. पर्यावरणीय संतुलन, पूरनियंत्रण आणि मुलुंडच्या पायाभूत सुविधांवर होणाऱ्या संभाव्य परिणामांच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सरकारच्या या प्रकल्पाला तीव्र विरोध दर्शविला होता. तसेच हा प्रकल्प रद्द करण्याची मागणी केली होती.
मिठागरे ही केवळ मोकळी जमीन नसून मुंबईच्या पर्यावरणीय व्यवस्थेचा महत्त्वाचा भाग असल्याचे आंदोलनादरम्यान नागरिकांनी अधोरेखित केले. मुसळधार पावसाच्या काळात अतिरिक्त पाणी साठवून ठेवण्याचे कार्य मिठागरे करतात. त्यामुळे या जागांवर मोठ्या प्रमाणावर बांधकाम झाल्यास मुंबईतील पूरस्थिती अधिक गंभीर होण्याची शक्यता असल्याची भीती पर्यावरणप्रेमी आणि स्थानिक नागरिकांनी यावेळी व्यक्त केली. तसेच याबाबत पर्यावरण व हवामान बदल विभागाकडे आणि एमसीझेडएमएकडे तक्रारही करण्यात आली होती.
एमसीझेडएमए यांनी मुलुंड येथील मिठागरांच्या जागेवर प्रस्तावित गृहनिर्माण प्रकल्प आणि त्यातून उद्भवणाऱ्या पर्यावरणीय धोक्यांबाबत दाखल करण्यात आलेल्या तक्रारीची गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणी एमसीझेडएमए यांनी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त, मीठागर उपायुक्त आमि वन विभागाच्या कांदळवन कक्षाचे अतिरिक्त प्रधान मुख्य वनसंरक्षक (एपीसीसीएफ) यांना नोटीस पाठवून तक्रारीची तपासणी करून आवश्यक ती चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत.
पर्यावरणीय हानीची चौकशी
मिठागर बचाव समितीच्या तक्रारीमध्ये मुलुंड मिठागरांच्या जागेवर प्रस्तावित गृहनिर्माण प्रकल्पामुळे पर्यावरणीय हानी व संभाव्य धोके निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. एमसीझेडएमएने संबंधित यंत्रणांना या प्रकरणाची सखोल चौकशी करून तक्रारदारांना थेट उत्तर देण्यास तसेच त्याची प्रत कार्यालयाला पाठविण्यास सांगितले आहे.
मुलुंडकरांमध्ये नाराजी
मुंबईच्या विकास आराखड्यात मिठागरांच्या संवर्धनाचा मुद्दा अनेकदा चर्चेत आला आहे. अशा गृहनिर्माण प्रकल्पांमुळे मिठागरांच्या भवितव्याचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
धारावी पुनर्वसन प्रकल्पातील अपात्र प्रकल्पबाधितांच्या पुनर्वसनाच्या मुद्द्यावरून आधीच मुलुंडकरांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. त्यात आता मिठागरांवरील प्रस्तावित गृहनिर्माण प्रकल्पामुळे स्थानिकांच्या चिंतेत आणखी भर पडली आहे. या दोन्ही प्रकल्पांमुळे वाहतूक व्यवस्था, पाणीपुरवठा, सार्वजनिक सुविधा आणि इतर पायाभूत सेवांवर अतिरिक्त ताण पडेल, अशी भीती आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली.
