मुंबई : मुलुंड पूर्व परिसरातील मोकळ्या जागांचा बळी घेणारे दोन प्रस्ताव शुक्रवारच्या सुधार समितीत मंजूर झाले. मुलुंड पूर्व परिसरात क्रीडासंकुलाचे आरक्षण बदलून पेट्रोल पंप असे आरक्षण दर्शवण्यास सुधार समितीने मंजूरी दिली. धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी मुलुंड कचराभूमीची १५ एकर जागा पाच वर्षांच्या भाडेपट्ट्यावर देण्याचा प्रस्तावही मंजूर करण्यात आला.

मुलुंडमधील हे दोन्ही प्रस्ताव मंजूर झाल्यामुळे मुलुंडमधील मोकळ्या जागांचा बळी देत असल्याचा आरोप विरोधकांनी सत्ताधारींवर विशेषतः भाजपवर केला. मुलुंडची जनता तुम्हाला माफ करणार नाही असाही टोला शिवसेना(ठाकरे) पक्षाच्या नगरसेवकांना भाजपच्या नगरसेवकांना लगावला.

धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी मुलुंडमधील आणखी १५ एकर जागा देण्यात येणार आहे. प्रकल्पासाठी आतापर्यंत विविध प्राधिकरणांची ५०० एकर जागा देण्यात आली आहे. त्यात आता मुलुंड कचराभूमीची १५ एकर जागाही दिली जाणार आहे. पुनर्विकास प्रकल्पाच्या कामासाठी लागणाऱ्या कास्टिंग यार्डसाठी ही जागा पाच वर्षाच्या भाडेतत्त्वावर अदानी समुहाच्या नवभारत मेगा डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेडला देण्यात येणार आहे. त्याकरीता ९८ कोटी ४६ लाख ८३ हजार ९१८ रुपये इतके भाडे आकारण्यात आले आहे.

याबाबतचा प्रस्ताव सुधार समितीत मंजुरीसाठी आला होता. या जागेवर कास्टिंग यार्ड, प्रीकास्ट उत्पादन केंद्र आणि रेडी-मिक्स काँक्रीट (आरएमसी) प्रकल्प उभारण्याचा प्रस्ताव आहे. मात्र आधीच धारावीतील अपात्र लोकांसाठी मुलुंडमध्ये घरे बांधण्यावरून मुलुंडकरांमध्ये संताप असताना या कास्टिंग यार्डमुळे मुलुंडमध्ये प्रदूषण होईल, वाहतूक कोंडी होईल असा मुद्दा काँग्रेसचे गटनेते अशरफ आजमी यांनी उपस्थित केला.

आमदार मिहीर कोटेचा यांच्या मागणीनुसार प्रस्ताव …

मुलुंड पूर्व येथे पेट्रोल पंप नसल्यामुळे पेट्रोल पंप उभारण्याकरीता क्रीडा संकुलाच्या जागेचे आरक्षण बदलून त्याजागी पेट्रोल पंपाचे आरक्षण टाकण्याची मागणी आमदार मिहीर कोटेचा यांनी प्रत्राद्वारे केली होती. त्यांच्या पत्रानुसार प्रशासनाने सुधार समितीमध्ये हा प्रस्ताव सादर केला होता. प्रस्तावानुसार सुमारे ४,२४७ चौ.मी. जागेवरील क्रीडासंकुलाचे आरक्षण हटवले जाणार आहे. मात्र, या निर्णयाला विरोधकांनी जोरदार आक्षेप घेतला.

पेट्रोल पंपासाठी जेवढी जागा आवश्यक आहे, त्यापेक्षा जास्त जागेचे आरक्षण बदलले जात असल्याचा आरोप शिवसेना (ठाकरे) पक्षाचे नगरसेवक विठ्ठल लोकरे यांनी केला. तसेच या ठिकाणी आधीच २००० चौमीची जागा महानगर गॅस लिमिटेडला दिल्यामुळे पुन्हा पेट्रोल पंपासाठी जागा कशाला असा प्रश्न शिवसेना (ठाकरे) पक्षाचे सचिन पडवळ यांनी उपस्थित केला. मुलुंड पूर्वमध्ये दीड लाख लोकसंख्या असून त्यांना पेट्रोल भरण्यासाठी मुलुंड पश्चिमेला यावे लागले. त्यामुळे या पेट्रोल पंपाची गरज असल्याचे मत भाजपचे मुलुंडचे नगरसेवक प्रकाश गंगाधरे यांनी मांडला.

मुलुंडच्या विषयावरून भाजपवर हल्ला

मुलुंडमधील या दोन विषयावरून शिवसेना (ठाकरे) पक्षाने भाजपवर टीका केली. मुलुंडची जनता तुम्हाला माफ करणार नाही असा टोला सचिन पडवण यांनी भाजपचे नगरसेवक प्रकाश गंगाधरे यांना लगावला. मुलुंडने भाजपला पाच नगरसेवक एक आमदार दिले पण तुम्ही मुलुंडमधील मोकळ्या जागांचा गळा घोटला असा आरोपही विरोधकांनी केला. यावेळी सभागृहात सत्ताधारी शिवसेना (शिंदे) पक्षाचे नगरसेवक शांत होते. त्यामुळे भाजपचे नगरसेवक एकाकी पडल्याचे चित्र पाहायला मिळाले.