मुंबई: मुलुंडमधील नवघर परिसरातील कामगार संक्रमण शिबिराला गुरुवारी दुपारी भीषण आग लागली. गॅस सिलिंडर स्फोटामुळे ही लागली असून त्यानंतर अनेक सिलिंडर स्फोट झाले. या दुर्घटनेत कुणीही जखमी झाले असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
धारावी पुनर्वसन प्रकल्पांतर्गत (पीएपी) मुलुंडच्या नवघर परिसरात मोठ्या प्रमाणात इमारतींचे बांधकाम सुरू आहे. येथील बांधकामस्थळी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या निवासासाठी बाजूलाच दुमजली कामगार संक्रमण शिबीर बांधण्यात आले आहे. याच संक्रमण शिबिरात दुपारी आग लागली. एका घरात गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्यानंतर संपूर्ण संक्रमण शिबिरात ही आग पसरली. आग लागल्याचे समजताच कामगारांनी तात्काळ घराबाहेर धाव घेतली व अग्निशमन दलाला घटनेची माहिती दिली. अग्निशमन दलाच्या चार गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या.
मात्र क्षणातच आग संक्रमण शिबिरात पसरली आणि अन्य घरांतील सात ते आठ गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. त्यामुळे आगीचा भडका उडाला. मात्र अग्निशमन दलाच्या जवानांनी तासाभरात या आगीवर नियंत्रण मिळवले. सर्वच कामगार घराबाहेर असल्याने जीवितहानी झाली नाही. मात्र कामगारांच्या घरातील सामानाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
