मुंबई : गरीब आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांसाठी धर्मादाय रुग्णालयांमध्ये राखीव असलेल्या खाटांचा वापर मूळ हेतूला धरूम होतो का याची आता पडताळणी होणार आहे. धर्मादाय रुग्णालयांतील पारदर्शकता आणि जबाबदारी सुनिश्चित करण्यासाठी विधी व न्याय विभागाने मंगळवारी अधिसूचनेद्वारे कठोर उपाययोजना जाहीर केल्या आहेत. त्यात नियमित तपासणी, संकेतस्थळावरील माहितीपट आणि मासिक अहवाल याद्वारे धर्मादाय रुग्णालयांवर देखरेख ठेवण्यात येणार आहे. राखीव खाटांचा तपशील संकेतस्थळावर जनतेसाठी उपलब्ध होईल. योजनेची अंमलबजावणी मासिक अहवालाद्वारे जाहीर करण्यात येणार असल्याने रुग्णालयांना आपली जबाबदारी यापुढे टाळणे शक्य होणार नाही.
विधी व न्याय विभागाने जाहीर केलेल्या उपाययोजनांमध्ये धर्मादाय रुग्णालयात कार्यरत शासकीय योजना आणि अन्य माहिती दर्शविणारे माहिती फलक दर्शनीय भागात लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. ही माहिती सर्वांना उपलब्ध होण्यासाठी ‘ऑनलाइन प्रणाली’ व ‘डिजिटल संचयिका’ ठेवण्यात यावी. रुग्णालयातील कार्यरत योजनांची अंमलबजावणीस टाळाटाळ करणाऱ्या तसेच ऑनलाइन प्रणालीचा वापर करण्यास टाळाटाळ करणाऱ्या धर्मादाय रुग्णालयांवर महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्यविषयक अधिनियम १९५० तसेच उच्च न्यायालयाच्या न्यायालयीन निर्णयानुसार योग्य कारवाई करण्यात येईल. धर्मादाय रुग्णालयांकडून निर्धन व दुर्बल घटकांतील किती रुग्णांना उपचार दिले, याबाबत प्राप्त होणारे मासिक अहवाल रुग्णालयांनी तसेच धर्मादाय आयुक्त कार्यालयाने सार्वजनिक अधिकाऱ्यांच्या मागणीनुसार उपलब्ध करून द्यावेत, आरक्षित खाटा निर्धन व दुर्बल घटकातील रूग्णांसाठी नियोजित उपचार किंवा शस्त्रक्रियेसाठी सर्व धर्मादाय रुग्णालयांनी ऑनलाईन प्रणालीद्वारे मंत्रालयातील ‘धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाची’ पूर्व मान्यता घ्यावी, अशा अनेक उपाययोजना सूचविण्यात आल्या आहेत. धर्मादाय रुग्णालयांची तपासणी करण्यासाठी समिती गठीत केली जाणार आहे.
त्याचप्रमाणे रुग्णांकडून सादर करण्यात येणाऱ्या उत्पन्नाच्या प्रमाणपत्राबाबत रुग्णालयांकडून तक्रार करण्यात येते. त्यामुळे महसूल व वन विभागामार्फत तहसिलदार यांना निर्धन व दुर्बळ घटकांतील रुग्णांच्या उत्पन्नाची तपासणी करून उत्पन्नाचे प्रमाणपत्र देण्याचे निर्देश दिले आहेत.
रुग्ण निधीवर धर्मादाय आयुक्तांचे नियंत्रण
सर्व धर्मादाय रुग्णालयांनी एकच निर्धन रुग्ण निधीचे (आयपीएफ) खाते उघडावे. तसेच एखाद्या रुग्णालयात एकाहून जास्त निर्धन रुग्ण निधीचे खाते असल्यास त्यांनी एकाच खात्याचा वापर करावा. इतर निधी रुग्ण निधीचे खात्यातील रक्कम एकाच खात्यात जमा करावी. सर्व धर्मादाय रुग्णालयांच्या निर्धन रुग्ण निधी खात्याचे केंद्रीकृत यंत्रणा निर्माण करून त्यामध्येच सर्व निधीबाबतचे नियंत्रण धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडून करण्यात यावे.
आवश्यक कागदपत्रे
निर्धन व दुर्बल घटकांतील रुग्णांच्या आर्थिक दर्जा संबंधित लाभार्थी रुग्णांनी, तहसीलदार उत्पन्न प्रमाणपत्र, शिधापत्रिका, दारिद्रय रेषेखालील पत्रिका, पॅन कार्ड (उपलब्ध असल्यास) यापैकी एक कागदपत्र रुग्णालयास दाखल करणे आवश्यक आहे.
तपासणी पथकात कोण?
धर्मादाय आयुक्त किंवा त्यांनी नियुक्त केलेले सदस्य, प्रधान सचिव, वैद्यकिय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग किंवा त्यांनी नियुक्त केलेले सदस्य, धर्मादाय रूग्णालय मदत कक्षाचे प्रमुख किंवा त्यांनी नियुक्त केलेले सदस्य तपासणी पथकात सहभागी असतील.
रूग्णालयांची यादी सादर करावी : स्थानिक महानगरपालिका क्षेत्रात जागा आणि इतर सवलती घेणाऱ्या आणि केंद्र / राज्य शासनाकडून/जिल्हाधिकाऱ्यांकडून जमीन सवलतीत घेणाऱ्या रुग्णालयांची यादी संबंधित विभागांनी तयार करावी व सदर यादी विधी व न्याय विभागाला सादर करावी.