मुंबई : प्रभादेवीमधी सिद्धीविनायक मंदिर परिसराच्या पुनर्विकास प्रकल्पाला सुरुवात झाल्यानंतर आता त्याच धर्तीवर मुंबादेवी मंदिर परिसराचाही कायापालट केला जाणार आहे. यासाठी पहिल्या टप्प्यात ५७ कोटी रुपये खर्च केले जाणार आहे. या कामासाठी मुंबई महापालिका प्रशासनाने निविदा मागवल्या आहेत.

गिरगाव नजिक असलेल्या मुंबादेवी मंदिराला ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि धार्मिक महत्त्व आहे. मुंबईकर आणि मुंबईत येणारे पर्यटक मुंबादेवी मंदिरात दर्शनासाठी येत असतात. मुंबई शहराचे नावही मुंबादेवीच्या नावावरून पडले आहे. मात्र मंदिर परिसरात आवश्यक मूलभूत सुविधांचा अभाव असल्याने येणाऱ्या भाविकांना अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे मुंबई महापालिकेने मुंबादेवी मंदिर परिसर विकास व सुशोभीकरण प्रकल्प हाती घेतला आहे.

ऐतिहासिक वारशाचे जतन, भाविकांसाठी सुविधा, पर्यटनाला चालना, आर्थिक विकास, पुनर्वसन, जागेचा अनुकूल पुनर्वापर आणि सांस्कृतिक वारशाचे संवर्धन हा या प्रकल्पाचा उद्देश असल्याचे पालिका प्रशासनाचे म्हणणे आहे. या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील कामांसाठी मुंबई महापालिकेच्या सी विभागाने निविदा मागवल्या असून या कामासाठी ५७ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.

दक्षिण मुंबईतील मुंबादेवी परिसर दाटीवाटीचा व अरुंद गल्ल्यांचा असून या परिसरात नेहमी वाहतूक कोंडी होते. तसेच इथे वाहनतळ नसल्यामुळे या परिसरात वाहने रस्त्यावरच उभी केली जातात. या परिसरात आजूबाजूला विविध साहित्यांच्या, नकली दागिन्यांच्या, भांड्यांच्या, कपड्याच्या, दागिन्यांच्या बाजारपेठा याहेत. त्यामुळे या परिसरात नेहमीच पादचाऱ्यांची आणि वाहनांची प्रचंड गर्दी असते. मंदिरात येणाऱ्या भाविकांसाठी इथे कोणत्याही सोयी – सुविधा नाहीत. त्यामुळे मुंबई महापालिकेने या परिसराचा कायापालट करण्याचे ठरवले आहे. मुंबई महापालिकेने या कामासाठी आराखडा तयार केला असून निविदा मागवल्या आहेत.

मंदिरालगत असलेल्या भूखंडावर केल्या जाणाऱ्या या सुशोभिकरण कामामध्ये विद्यमान बांधकामांचे पाडकाम करून उत्खनन व भरावाची कामे केली जाणार आहेत. तसेच पाणीपुरवठा, मलनिस्सारण वाहिन्या, पर्जन्यजल वाहिन्या व इतर उपयुक्त सेवांचे जाळेही उभारले जाणार आहे. तसेच अंतर्गत रस्त्यांची सुधारणा, पदपथाचीही सुधारणा केली जाणार आहे.

मंदिर परिसरात आकर्षक अशा दगडी संरचनांची उभारणी केली आहे. तसेच मंदिरात पूर्वी असलेला एक जलाशय पुनरुज्जीवित करण्यात येणार आहे. तसेच कारंजेही उभारण्यात येणार आहेत. त्याचबरोबर मंदिर परिसरात हिरवळ तयार केली जाणार असून प्रकाशयोजना, विद्युतीकरण व यांत्रिक कामेही केली जाणार आहेत.