मुंबई : पश्चिम रेल्वेवरील गोरेगाव – कांदिवलीदरम्यान सहाव्या मार्गिकेचे काम सुरू असून या कामासाठी ७ सप्टेंबर रोजी रात्री १२ वाजल्यापासून ८ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजेपर्यंत १० तासांचा मोठा ब्लाॅक घेण्यात येणार आहे. त्यामुळे अप आणि डाऊन धीम्या, जलद मार्गावरील लोकल सेवा विस्कळीत होण्याची चिन्हे आहेत. परिणामी, ऐन गणेशोत्सवात प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.
गोरेगाव – कांदिवलीदरम्यान ४.५ किमी लांबीची रेल्वे मार्गिका तयार करण्याचे काम सुरू आहे. ७ सप्टेंबर रोजी रात्री १२ वाजल्यापासून घेण्यात येणाऱ्या ब्लाॅकमुळे सर्व अप धीम्या मार्गावरील लोकल बोरिवली – गोरेगावदरम्यान अप जलद मार्गावर धावतील. त्याचप्रमाणे डाऊन धीम्या मार्गावरील सर्व लोकल अंधेरीहून डाऊन जलद मार्गावर धावतील आणि या लोकल गोरेगाव स्थानकाच्या फलाट क्रमांक ७ वर जातील.
गोरेगाव – बोरिवली स्थानकांदरम्यान सर्व डाऊन धीम्या मार्गावरील लोकल पाचव्या मार्गावरील धावतील. तर, फलाट उपलब्ध नसल्याने राम मंदिर, मालाड आणि कांदिवली स्थानकावर थांबणार नाहीत. याशिवाय, चर्चगेट-बोरिवली मार्गावरील काही धीम्या लोकल सेवा गोरेगाव स्थानकावर अल्पावधीत थांबतील आणि तेथून चर्चगेटच्या दिशेने वळतील. ब्लॉक कालावधीत अप आणि डाउन मेल/एक्स्प्रेसला अंदाजे १० ते २० मिनिटे विलंब होणार असल्याची माहिती प्रवाशांना देण्यात आली आहे. ब्लॉकदरम्यान काही लोकल रद्द करण्यात येणार असून काही लोकल अंशत: रद्द करण्यात येणार आहेत, अशी माहिती पश्चिम रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली.