मुंबई: दादर टीटी खोदाद सर्कल येथे बुधवारी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास सिग्नलवर उभ्या असलेल्या डंपरला बेस्टच्या महिला विशेष ‘तेजस्विनी’ बसने जोरदार धडक दिली. या धडकेत बसच्या पुढील भागाचे प्रचंड नुकसान झाले. या अपघातात बसचालक, वाहक आणि प्रवासी मिळून १० जण जखमी झाले. बसचालक व वाहकाची प्रकृती गंभीर असून जखमींवर पालिकेच्या शीव येथील लोकमान्य टिळक रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘तेजस्विनी’ विशेष बस महिला प्रवाशांसाठी सुरू करण्यात आली असून  गर्दीच्या वेळी सर्वसामान्य प्रवाशांना सेवा देते. बेस्ट उपक्रमाची बस क्रमांक २२ मरोळ बस आगार ते पायधुनीदरम्यान धावते. बुधवारी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास मरोळ बस आगारातून निघालेली ‘तेजस्विनी’ बस दादर टीटी खोदाद सर्कल येथे आली. त्या वेळी सिग्नलवर उभ्या असलेल्या डंपरला मागून भरधाव येणाऱ्या बसने जोरदार धडक दिली. चालकाचा बसवरील ताबा सुटल्याचे सीसी टीव्हीत कैद झाले. या भीषण अपघातात १० जण जखमी झाले. जखमींपैकी चालक राजेंद्र सुदाम काळे (५२), वाहक काशीराम धुरी (५७) यांची प्रकृती गंभीर आहे, तर आठ प्रवासी जखमी झाले आहेत. त्यापैकी दोन प्रवाशांना शीव रुग्णालयात उपचार केल्यानंतर घरी सोडण्यात आले. ताहीर हुसेन (५२) रुपाली गायकवाड (३६ ), सुलतान अन्सारी (५०), मन्सूर अली (५२),  श्रावणी म्हस्के (१६) व वैदेही बामणे (१७) अशी जखमी प्रवाशांची नावे आहेत. दरम्यान, याप्रकरणी माटुंगा पोलिसांनी बसचालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी दोन प्रवाशांचे जबाब नोंदविण्यात आले आहेत.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai 10 injured in best bus accident at dadar zws
First published on: 28-10-2021 at 04:20 IST