मुंबई : प्रदीर्घ तुरुंगवास आणि खटल्याला होणारा विलंब या कारणास्तव १३ जुलै २०११ रोजी मुंबईत झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील दोन आरोपींना विशेष न्यायालयाने शुक्रवारी विशेष जामीन मंजूर केला. हे दोन्ही आरोपी गेल्या १५ वर्षांपासून कारागृहात होते.
महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्याअंतर्गत( मकोका) स्थापन विशेष न्यायालयाचे न्यायाधीश सत्यनारायण नावंदर यांनी आरोपी नकी अहमद शेख आणि हारून नाईक यांना जामीन अर्ज मंजूर केला. आरोपींच्या ””जलद खटल्याच्या अधिकाराचा”” विचार कनिष्ठ न्यायालयाने केवळ कायद्याच्या कागदापुरता मर्यादित न ठेवता, त्यामागील ””मूळ उद्देशाचा विचार करणे आवश्यक आहे. संविधानातील तरतुदींचा विचार केवळ घटनात्मक न्यायालयांनीच नव्हे, तर कनिष्ठ न्यायालयांनीही करणे आवश्यक असल्याचे निरीक्षण न्यायालयाने दोन्ही आरोपींना जामीन मंजूर करताना नोंदवले. यापूर्वी प्रकरणातील काही आरोपींना उच्च न्यायालयाने दीर्घ कारावासाच्या पार्श्वभूमीवर जामीन मंजूर केला होता. ही बाब तसेच या आरोपींच्याही दीर्घकाळच्या तुरुंगवासाच्या कारणास्तव निव्वळ हा जामीन मंजूर करत असून सरकारी पक्षाच्या खटल्याच्या गुणवत्तेबाबत कोणतेही मत व्यक्त करत नसल्याचे विशेष न्यायाधीशांनी स्पष्ट केले.
प्रकरण काय ?
मुंबईतील ऑपेरा हाऊस, झवेरी बाजार आणि दादर पश्चिम येथील कबुतरखाना या तीन ठिकाणी एकाच वेळी १३ जुलै २०११ रोजी बॉम्बस्फोट घडवून आणले गेले होते; या स्फोटांमध्ये २७ नागरिक मृत्यूमुखी पडले होते, तर १३० हून अधिक जखमी झाले होते. या प्रकरणातील सुमारे डझनभर आरोपींवर अटकेनंतर तब्बल आठ वर्षांनी म्हणजेच सप्टेंबर २०१९ मध्ये आरोप निश्चित करण्यात आले. सध्या या खटल्यावर नियमित सुनावणी सुरू आहे.
