मुंबई : मालाडच्या मालवणी येथे १४ वर्षांच्या मुलीचा ३० वर्षांच्या व्यक्तीसोबत बालविवाह केल्याचे उघडकीस आले आहे. या मुलीने रुग्णालयात बाळाला जन्म दिल्यानंतर या प्रकरणाला वाचा फुटली. मालवणी पोलिसांनी मुलीशी लग्न करणारा, तसेच दोन्ही कुटुंबियांविरोधात गुन्हे दाखल केले आहेत.

पीडित मुलगी १४ वर्षांची आहे. मालाडच्या मालवणी येथे राहणाऱ्या व्यक्तीने तिच्याशी बळजबरीने लग्न केले. मुलगी अल्पवयीन असल्याचे माहीत असूनही मुला – मुलीचे पालक, तसेच लग्न लावणारा यावेळी उपस्थित होते. लग्नानंतर पीडित मुलगी गर्भवती राहिली. ती एका खासगी रुग्णालयात प्रसूत झाली. त्यावेळी ती अल्पवयीन असल्याची बाब समोर आली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रुग्णालयाने याबाबतची माहिती पोलिसांना दिली. मालवणी पोलिसांच्या वतीने सहाय्यक पोलीस निरीक्षक मीना गोरे यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली. या तक्रारीनुसार पोलिसांनी पीडितेशी बेकायदेशीरपणे लग्न करून तिच्यावर बलात्कार करणारा, तसेच मुलीचे आणि मुलाचे पालक, लग्न लावणारा यांच्याविरोधात बालविवाह प्रतिबंधक कायदा, बलात्काराप्रकरणी कलम ६४ (२) (आय), ६४ (२) (एम), ६५ (१), तसेच पोक्सोच्या कलमाअंतर्गत गुन्हे दाखल केले आहेत. मुलीच्या प्रसुतीनंतर ही घटना उजेडात आली. आम्ही आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला असून त्यांचा शोध सुरू आहे, अशी माहिती मालवणी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलैंद्र नगकर यांनी दिली.