मुंबई : पंधरा वर्षांपूर्वी, २०११ मध्ये मुंबईत झालेल्या तिहेरी साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील जुनैल शेख या आरोपीला विशेष सत्र न्यायालयाने बुधवारी जामीन मंजूर केला. जवळपास १५ वर्षांचा प्रदीर्घ कारावास आणि यापूर्वी सह-आरोपींना मंजूर झालेला जामीन याचा दाखला देऊन विशेष न्यायालयाने त्याला जामीन मंजूर केला.

महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यांतर्गत (मोक्का) दाखल या खटल्याची सुनावणी घेणारे विशेष न्यायालयाचे न्यायाधीश सत्यनारायण आर. नावंदर यांनी हा निर्णय दिला. आपल्याला आरोपीवरील आरोप अत्यंत गंभीर असल्याची जाणीव आहे आणि त्यामुळेच सरकारी पक्षाच्या पुराव्यांच्या गुणवत्तेवर कोणतेही मत व्यक्त करण्यापासून स्वतःला रोखले आहे. तथापि, आरोपी शेख याच्या जामीन अर्जाचा विचार केवळ दीर्घकाळ कारावासात राहिल्यामुळे निर्माण झालेल्या घटनात्मक मुद्यांवर आणि आधीच सहआरोपींची जामिनावर सुटका झाल्याच्या आधारे करत असल्याचे न्यायालयाने म्हटले. शेख हा २०१२ पासून न्यायालयीन कोठडीत आहे.

दक्षिण मुंबईतील ऑपेरा हाऊसजवळील ”प्रसाद चेंबर्स”बाहेर पंधरा वर्षांपूर्वी, १३ जुलै २०११ रोजी सायंकाळी ६:५४ वाजता बॉम्बस्फोट झाला होता. त्यानंतर, झवेरी बाजार आणि दादर येथे बॉम्बस्फोट झाला होता. या स्फोटांमध्ये २७ जणांचा मृत्यू आणि १३० हून अधिकजण जखमी झाले होते. समानता आणि दीर्घ कारावास या आधारे जामीन देण्याची मागणी शेख याच्या वतीने करण्यात आली होती.

खटल्याला झालेला विलंब आणि दीर्घ कारावास लक्षात घेऊन न्यायालयाने या वर्षी १० एप्रिल रोजी नकी अहमद वसी अहमद शेख आणि हारून रशीद अब्दुल हमीद नाईक या दोन सह-आरोपींना आधीच जामीन मंजूर केला होता, असेही शेख याने न्यायालयाला सांगितले. तसेच, स्फोटांमध्ये आरोपीचा सहभाग सिद्ध करण्यासाठी कोणताही ठोस पुरावा उपलब्ध नसल्याचा दावा केला होता. प्रकरणातील विशेष सरकारी वकिलांनी मात्र शेख याच्या अर्जाला विरोध केला आणि त्याच्याविरुद्ध कबुलीजबाब आणि सीसीटीव्ही चित्रीकरणासह पुरेसा पुरावा उपलब्ध असल्याचा दावा केला होता.