येत्या डिसेंबरपर्यंत मुंबईकरांसाठी टप्प्याटप्याने भाडेतत्त्वावरील ५०० हून अधिक वातानुकूलित बस बेस्ट उपक्रमाच्या ताफ्यात दाखल करण्यात येणार आहेत. मिडी, मिनीऐवजी १२ मीटर लांबीच्या या बसगाड्या असतील. यामध्ये एकमजली बसची संख्या अधिक असेल. तर काही वातानुकूलित दुमजली बसचाही समावेश असेल. त्यामुळे गारेगार प्रवासाबरोबरच प्रवासी वाहून नेण्याची क्षमताही वाढणार आहे.

सध्या बेस्टच्या ताफ्यात तीन हजार ६६८ हून अधिक बस असून त्यात एक हजार ३२३ वातानुकूलित आणि दोन हजार ३४५ विनावातानुकूलित बसचा समावेश आहे. एकूण बसताफ्यामध्ये १,७०० हून अधिक बस मिडी, मिनी स्वरुपाच्या आहेत. परंतु मिडी, मिनी बसची प्रवासी वाहून नेण्याची क्षमता कमी आहे. परिणामी, बेस्टची वाढती प्रवासी संख्या लक्षात घेता मिडी बस अडचणीच्या ठरू लागल्या आहेत. या बसना प्रवाशांकडून पसंती मिळत असली तरीही कमी प्रवासी क्षमता असल्याने बसमध्ये गर्दी होते आणि प्रवाशांना नाईलाजाने दाटीवाटीने उभे राहून प्रवास करावा लागतो. यामुळे डिसेंबर २०२२ पर्यंत भाडेतत्त्वावरील १२ मीटर लांबीच्या ५०० वातानुकूलित बस सेवेत दाखल करण्यात येणार आहेत.

बहुतांश बस या एकमजली असतील. तर काही बस दुमजलीही असणार –

५०० बसमध्ये बहुतांश बस या एकमजली असतील. तर काही बस दुमजलीही असणार आहेत. १८ ऑगस्टला पहिली दुमजली वातानुकूलित बस ताफ्यात समाविष्ट होणार आहे. त्यानंतर सप्टेंबरपासून ही बस प्रवाशांच्या सेवेत येईल. येत्या एक ते दोन वर्षात एकूण ९०० वातानुकूलित दुमजली बस मुंबईत धावणार असून पहिल्या टप्प्यात २०० दुमजली बसचा ताफ्यात समावेश करण्यात येणार आहे. यातील १०० बस येत्या डिसेंबरपर्यंत दाखल करण्याचे उदिद्ष्ट असल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.