मुंबई: ७० वर्षीय पणजीने केलं ४ वर्षांच्या पणतीला मूत्रपिंड दान

चार वर्षांची मुलगी मूत्रपिंडाच्या शेवटच्या टप्प्यातील आजाराने होती ग्रस्त

प्रातिनिधिक फोटो

एका अनोख्या आणि दुर्मिळ प्रकरणात ७० वर्षीय पणजीने आपल्या ४ वर्षे वयाच्या पणतीला मूत्रपिंडाचे दान केले आणि या मुलीला आयुष्य जगण्याची नव्याने संधी मिळाली. प्रत्यारोपणाच्या प्रकरणामध्ये रुग्ण व अवयवदाता यांच्यात चार पिढ्यांचे अंतर असण्याची अपवादात्मक गोष्ट या प्रकरणात घडली. आयझा तन्वीर कुरेशी हिला ‘फोकल सेगमेंटल ग्लोमेरुलोस्क्लेरोसिस’ (एफएसजीएस) नावाने ओळखल्या जाणारा मूत्रपिंडाचा शेवटच्या टप्प्यातील आजार होता आणि तिला मूत्रपिंड प्रत्यारोपणाची तातडीची गरज होती. कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल (केडीएएच) येथे २५ नोव्हेंबरला प्रत्यारोपण तज्ज्ञांच्या पथकाने तिच्यावर प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया यशस्वीपणे केली. कोणतीही अनुचित घटना न घडता अवयवदात्री व रुग्ण या दोघींची प्रकृती सुधारली व त्यांना यशस्वी शस्त्रक्रियेनंतर घरी सोडण्यात आले.

रूग्णालयातील नेफ्रॉलॉजी विभागाचे प्रमुख व सल्लागार डॉ. शरद शेठ यांनी सांगितले, “ही रुग्ण तिच्या पालकांची एकुलती एक मुलगी आहे. ती आमच्या रूग्णालयात आली तेव्हा तिच्या चेहऱ्यावर सूज होती. मागील ६ महिन्यांपासून तिला हा त्रास होत होता व तो वाढू लागला होता. तसेच तिला भूक कमी लागणे, मळमळ व उलटी असेही त्रास होत होते. तिच्या मूत्रपिंडाचे कार्य संपूर्णपणे विस्कळीत होऊन तिला ‘मेटॅबॉलिक अॅसिडोसिस’ झाल्याचे आढळून आले. तिला तातडीने ‘हिमोडायलिसिस’वर ठेवण्यात आले. मूत्रपिंड प्रत्यारोपणाची तिला गरज होती. अवयवदात्री व रूग्ण यांच्यातील नाते व त्यांच्या वयातील अंतर पाहता ही माझ्या ४० वर्षांच्या कारकिर्दीतील अगदी एकमेवाद्वितीय अशी प्रत्यारोपणाची केस होती.”

रूग्णाच्या संपूर्ण कुटुंबात तिच्या ७० वर्षांच्या पणजीचे मूत्रपिंड हेच रुग्णाला अनुकूल ठरणारे होते. ही पणजी निरोगी होती व तिचा रक्त गटही रूग्णाशी सुसंगत होता. तिचे वय लक्षात घेऊन तिचे संपूर्ण मूल्यांकन आणि तपासणी करण्यात आली. ती अवयवदान करण्यासाठी योग्य असल्याचे मूल्यांकनात आढळले. प्रत्यारोपण यशस्वीरित्या पार पडल्यावर अवयवदात्री आणि प्राप्तकर्ती या दोघींची प्रकृती उत्तम आहे. पाचव्या दिवशी पणजीला सोडण्यात आले. रुग्णाच्या मूत्रपिंडाच्या कार्याच्या चाचण्या घेण्यात आल्या व त्यामध्ये सुधारणा दिसून आली. शस्त्रक्रियेच्या चौदाव्या दिवशी रुग्णाला डिस्चार्ज देण्यात आला.

डॉ. शेठ यांच्या नेतृत्वाखाली, रूग्णालयातील डॉक्टरांच्या पथकाने ही मूत्रपिंड प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया यशस्वीरित्या केली. या पथकामध्ये ‘अॅंड्रॉलॉजी व रीकन्स्ट्रक्टिव्ह युरॉलॉजी’ विभागाचे प्रमुख डॉ. संजय पांडे, ‘युरॉलॉजी’तील सल्लागार व मूत्रपिंड प्रत्यारोपणातील सर्जन डॉ. अत्तार महंमद इस्माईल यांचा तसेच अन्य डॉक्टरांचा समावेश होता.

रुग्णाच्या आईने आभार व्यक्त करताना म्हटले, “या रुग्णालयात आम्हाला मिळालेल्या मदतीबद्दल आम्ही सर्व संबंधितांचे आभारी आहोत. आमच्या मुलीला कोकिलाबेन हॉस्पिटलमध्ये आणण्याचा आम्ही घेतलेला निर्णय सर्वात योग्य होता. येथे तिच्या तब्येतीला चांगले वळण लाभले. माझ्या लहान मुलीला दर दिवसाआड अनेक तास हिमोडायलिसिस घेताना पाहून मनाला खूप वेदना होत होती. डॉ. शेठ आणि त्यांच्या टीमने माझ्या मुलीला इतर मुलांप्रमाणेच सामान्य जीवन जगण्याची संधी दिल्याबद्दल आम्ही कायम कृतज्ञ आहोत. माझी आजी माझ्या मुलीसाठी तारणहार म्हणून आली. तिचे आभार मानायला माझ्याकडे शब्द पुरेसे नाहीत”, अशा भावना चार वर्षीय मुलीच्या आईने व्यक्त केल्या.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Mumbai 70 years old maternal great grandmother donates a kidney to four years old girl as she gets a new life vjb

Next Story
न्यायालयाचा ‘अंतिम’ आदेश नसल्याने शालेय बसवर अद्याप कारवाईचा बडगा नाही
ताज्या बातम्या