मुंबई : पोलिसांच्या नावाने अटकेची भीती दाखवून मालाड पश्चिम येथील ८८ वर्षीय निवृत्त महिलेची एक कोटी ५५ लाख १० हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी उत्तर विभाग सायबर पोलिसांनी चेंबूरमधून दोघांना अटक केली. यश योगेश चौहान (वय २०) व समीर बाळू भोसले (२१) अशी आरोपींची नावे आहेत. दोघेही चेंबूरमधील रमाबाई आंबेडकर नगर परिसरात राहतात. सायबर भामट्यांना कमिशनच्या बदल्यात बँक खाती उपलब्ध करून देऊन फसवणुकीची रक्कम वळविण्यास मदत केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.
मालाड पश्चिम येथे एकट्या राहणाऱ्या या महिलेचा ७ एप्रिल २०२६ रोजी एका अनोळखी व्यक्तीने दूरध्वनी केला. आपण नाशिकमधील वरिष्ठ पोलीस अधिकारी असल्याचे सांगून महिलेच्या आधार क्रमांकाचा वापर आर्थिक गैरव्यवहारासाठी झाल्याचा व त्यांच्याविरुद्ध अटक वॉरंट जारी झाल्याचा बनाव करण्यात आला. त्यानंतर तपास अधिकारी असल्याचे भासविणाऱ्या दुसऱ्या व्यक्तीने संपर्क साधला. त्याने सर्वोच्च न्यायालयाच्या नावाने बनावट अटक वॉरंट व अधिकृत नोटिसा पाठवून महिलेचा विश्वास संपादन केला.
अटकेची भीती दाखवून महिलेची बँक खाती, मुदत ठेवी, गुंतवणूक व मालमत्तेची माहिती घेण्यात आली. तपास पूर्ण होईपर्यंत रक्कम सुरक्षित खात्यात जमा करावी व चौकशीनंतर ती परत केली जाईल, असे सांगण्यात आले. अटकेच्या भीतीने महिलेने ७ ते २५ एप्रिलदरम्यान वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये टप्प्याटप्प्याने एक कोटी ५५ लाख १० हजार रुपये हस्तांतरित केले. मात्र, ही रक्कम परत मिळाली नाही.
दरम्यान, फसवणुकीची रक्कम ज्या बँक खात्यांमध्ये जमा झाली, त्यांची तपासणी करताना यश चौहान याच्या खात्यात पाच लाख रुपये वळविण्यात आल्याचे पोलिसांना आढळले. त्याच्या बँक खात्याशी संबंधित माहिती व ग्राहक ओळख पडताळणीच्या तपशीलांच्या आधारे पोलिसांनी त्याचा माग काढला. चौहान व भोसले हे मित्र असून, त्यांनी स्वतःची बँक खाती तसेच नव्याने उघडलेली खाती सायबर भामट्यांना उपलब्ध करून दिल्याचा आरोप आहे. या बदल्यात त्यांना कमिशन मिळत होते.
काही महिने फरारी असलेल्या दोघांचा तांत्रिक माहितीच्या आधारे शोध घेऊन पोलिसांनी त्यांना चेंबूरमधून अटक केली. बोरिवली न्यायालयाने दोघांना पुढील तपासासाठी पोलीस कोठडी सुनावली. या फसवणुकीमागील मुख्य सूत्रधार, पैसे स्वीकारणारी अन्य खाती व व्यवहारांची पुढील साखळी शोधण्याचे काम सुरू आहे. या जाळ्यात मुंबईतील आणखी काही व्यक्ती सहभागी असल्याचा पोलिसांना संशय आहे.
दरम्यान, फसवणूक झाल्याचे महिलेच्या लक्षात आले तेव्हा त्यांनी याबाबत आपल्या बहिणीला सांगितले. बहिणीने वृत्तपत्रातील ‘डिजिटल अटक’ फसवणुकीसंबंधीची बातमी वाचल्यानंतर त्यांना सायबर पोलिसांकडे तक्रार करण्याचा सल्ला दिला. त्यानंतर उत्तर विभाग सायबर पोलिसांकडे तक्रार करण्यात आली.
