करोना केंद्राच्या कंत्राटातील कथित गैरव्यवहाराप्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत यांचे व्यावसायिक मित्र सुजीत पाटकरसह आणखी तिघांविरोधात आझाद मैदान पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी याप्रकरणी ३८ कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याची तक्रार केली असून त्यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणाचा पुढील तपास आर्थिक गुन्हे शाखेकडून करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या अटकेनंतर त्यांचे व्यावसायिक मित्र सुजित पाटकर रडारवर आले असून कराना केंद्रातील कंत्राटाप्रकरणी सुजित पाटकर आणि अन्य तिघांविरूद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. किरीट सोमय्यांच्या तक्रारीनुसार आझाद मैदान पोलीस ठाण्यात फसवणूक, बनावट कागदपत्र सादर करणे, विश्वासघात केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मार्च २०२२ मध्ये सोमय्या यांनी न्यायालयातही अर्ज केला होता –

सोमय्या यांच्या तक्रारीनुसार याप्रकरणी ३८ कोटी रुपयांची फसवणूक झाली आहे. याप्रकरणी लाईफलाईन रुग्णालयाच्या व्यवस्थापन सेवेसह डॉ हेमंत गुप्ता, सुजित पाटकर, संजय शहा आणि राजू साळुंखे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे प्रकरण पुढील तपासासाठी आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात येण्याची शक्यता असल्याचे सूत्रांनी सांगितले. मार्च २०२२ मध्ये सोमय्या यांनी न्यायालयातही अर्ज केला होता.