मुंबई : दोन अल्पवयीन मुलींचा विनयभंग करणाऱ्या ४६ वर्षीय आरोपीचा महिलेने पाठलाग करून पकडून दिल्याची घटना मालाडमध्ये घडली. आरोपीने महिलेची १३ वर्षांची मुलगी आणि तिच्या मैत्रिणीचा विनयभंग केला.

आरोपी माँटी गरोडिया भाईंदर (पश्चिम) येथील रहिवासी आहे. मालाड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ७ जून रोजी तक्रारदार महिलेची १३ वर्षांची मुलगी आणि तिची मैत्रिण (एक १३ वर्षांची मुलगी) या दोघी शाळेच्या प्रवेशद्वारातून बाहेर येत असताना आरोपीने गर्दीचा फायदा घेत त्यांचा विनयभंग केला. तक्रारदार महिलेच्या मुलीने तिला घडलेला प्रकार सांगितला. मात्र आपल्या मुलीला गर्दीत कोणी तरी चुकून स्पर्श केला असावा, असे समजून तिने त्याकडे दुर्लक्ष केले. पण आरोपी वारंवार तसा प्रकार करीत असल्याचे मुलीने आईला सांगितले. त्यावेळी तक्रारदार महिलेने पाळत ठेवून आरोपीला पकडण्याचा निर्णय घेतला.

हेही वाचा – चौपाट्यांवर तैनात सुरक्षा रक्षक मूलभूत सुविधांपासून वंचित, सुविधा उपलब्ध करण्याची म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेची मागणी

हेही वाचा – आरोग्य सेविका व आशा सेविकांच्या आंदोलनाची महानगरपालिकेने घेतली दखल, मागण्यांवर सविस्तर चर्चेसाठी बुधवारी बोलावली बैठक

ती शाळेत गेली आणि मुली बाहेर येण्याची वाट पाहू लागली. मुली बाहेर आल्यावर आरोपी त्यांच्या जवळ गेला. मुलीने त्याच्याकडे लक्ष वेधले, त्यानंतर तक्रारदार महिलेने त्याला पकडले. मात्र संशयित पळून जाण्याचा प्रयत्न करीत होता. मुलीच्या आईने काही अंतरापर्यंत त्याचा पाठलाग केला आणि गस्तीवर असलेल्या पोलीस पथकाच्या मदतीसाठी आरडाओरडा केला. त्यानंतर गरोडियाला पकडण्यात आले आणि त्याला पोलीस ठाण्यात नेण्यात आले. त्याच्यावर भारतीय दंड संहितेच्या कलम ३५४, ३५४ ड आणि लैंगिक अपराधांपासून मुलांचे संरक्षण कायद्याच्या ८ आणि १२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.