मुंबई : मागील तीन वर्षांमध्ये गर्भपाताच्या घटनांमध्ये पाच हजारांनी घट झाली असली तरी मुंबईमध्ये दरवर्षी २० हजारांपेक्षा अधिक महिला गर्भपात करत आहेत. त्यात २५ ते ३४ वयोगटातील महिलांमध्ये गर्भपाताचे प्रमाण अधिक असले तरी १९ वर्षाखालील मुलींच्या गर्भपाताच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. गर्भपाताच्या या घटनांमध्ये गर्भनिरोधक पद्धतीचा अयोग्य आणि अपुरा वापर किंवा गर्भनिरोधक अयशस्वी ठरल्यामुळे गर्भधारणा झालेल्या प्रकरणांचा अधिक समावेश आहे.

मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार मागील तीन वर्षांमध्ये गर्भपाताच्या संख्येत घट झाली असली तरी गर्भपाताची संख्या ही २० हजारांपेक्षा अधिक आहे. त्यात वैद्यकीय गर्भपाताबरोबरच नैसर्गिक गर्भपाताचे प्रमाणही अधिक आहे. २०२३-२४ मध्ये ३० हजार ५११ महिलांनी गर्भपात केला होता. त्यात वैद्यकीय गर्भपाताचे प्रमाण २५ हजार ८३५ तर नैसर्गिक गर्भपाताची संख्या ४ हजार ६७६ इतकी आहे. २०२४-२५ मध्ये २५ हजार १७६ महिलांनी गर्भपात केला होता. त्यात वैद्यकीय गर्भपाताचे प्रमाण २० हजार ९५० तर नैसर्गिक गर्भपाताची संख्या ४ हजार २२६ इतकी आहे. २०२४-२५ मध्ये २३ हजार ९२३ महिलांनी गर्भपात केला होता. यामध्ये वैद्यकीय गर्भपाताचे प्रमाण २० हजार ५५२ तर नैसर्गिक गर्भपाताची संख्या ३ हजार ३७१ इतकी आहे. गर्भपाताचे प्रमाण कमी करण्यासाठी महानगरपालिकेकडून जागरुकता कार्यक्रम राबविण्यात येत आहेत. या उपक्रमांना काही प्रमाणात यश मिळत असले तरी अद्यापही दरवर्षी गर्भपात हाेण्याचे प्रमाण अधिक असल्याचे दिसून येते.

१९ वर्षाखालील मुलींच्या गर्भपाताची संख्या चिंताजनक

मुंबईमध्ये मागील तीन वर्षांमध्ये गर्भपाताच्या संख्येत घट होत असली तरी १९ वर्षाखालील मुलींच्या गर्भपाताची संख्या चिंताजनक आहे. २०२३-२४ या वर्षामध्ये १९ वर्षाखालील ३३३ मुलींचे गर्भपात करण्यात आले. २०२४-२५ मध्ये हे प्रमाण ७१६ इतके वाढले. मात्र २०२४-२५ मध्ये यामध्ये पुन्हा घट होऊन ते ३६५ इतके झाले.

गर्भनिरोधकाचा अयोग्य वापर

मुंबईत होत असलेल्या गर्भपातामध्ये सर्वाधिक गर्भपात हे गर्भनिरोधक पद्धतीचा अयोग्य आणि अपुरा वापर किंवा गर्भनिरोधक अयशस्वी ठरल्यामुळे होत आहेत. २०२३-२४ मध्ये गर्भनिरोधकातील त्रुटीमुळे २२ हजार १४९ महिलांनी गर्भपात केला. तर २०२४-२५ मध्ये १९ हजार ४९५ महिलांनी तर २०२५-२६ मध्ये १८ हजार ९६६ महिलांना गर्भपात करावा लागला.

मृत्यूचे प्रमाण रोखण्यात यश

२०१७-१८ मध्ये १९ महिलांचा गर्भपातामुळे मृत्यू झाला होता. मात्र मागील काही वर्षामध्ये गर्भपातामुळे होणारे मृत्यू रोखण्यात यश आले आहे. २०२३-२४ मध्ये दोन महिलांचा मृत्यू झाला. मात्र मागील दोन महिन्यांमध्ये एकाही महिलेचा गर्भपातादरम्यान मृत्यू झालेला नाही.