Three people died in a horrific road accident at Marine Drive : दक्षिण मुंबईतील मरीन ड्राइव्ह येथे सोमवारी पहाटे एका वेगवान दुचाकीने पादचाऱ्याला धडक दिल्याने तिघांचा मृत्यू झाला, अशी माहिती पोलिसांनी दिली. पीटीआयने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.
एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, ही दुर्घटना पहाटे ५.४० च्या सुमारास एन. एस. रोडवरील ‘पारसी जिमखाना’ जंक्शन सिग्नलवर घडली. दुचाकीस्वार आपली मोटारसायकल अत्यंत बेजबाबदारपणे चालवत होता आणि त्याच्यासोबत एक महिला पाठीमागे बसलेली होती. दुचाकीस्वाराने सिग्नलकडे दुर्लक्ष केले आणि पादचाऱ्याला जोरदार धडक दिली. या धडकेत तिघांचाही जागीच मृत्यू झाला. मुंबई पोलीस या घटनेचा तपास करत असून अपघात नेमका कोणत्या कारणामुळे घडला, याचा संपूर्ण तपशील समोर आलेला नाही.
मरीन ड्राईव्हवर नेमकं काय घडलं?
मुंबईच्या मरीन ड्राईव्हवर आसपास राहणारे अनेक नागरिक मॉर्निंग वॉकला येत असतात. त्याचप्रमाणे एक वृद्ध व्यक्ती मॉर्निंग वॉकला आले होते. त्यावेळी बेदरकारपणे आलेल्या एका दुचाकीची धडक या वृद्ध व्यक्तीला लागली. तसंच, इतर दोन स्कुटींनाही ही दुचाकी धडकली. या तिहेरी अपघातात दुचाकीवरील दोघे अन् पादचारी वृद्ध व्यक्ती गंभीर जखमी झाली. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक बचाव पथकाने जखमींना जवळच्या जे. टी. रुग्णालयात दाखल केलं. परंतु, उपचारांआधीच या तिघांचा मृत्यू झाला. एन.एस रोडच्या उत्तर दिशेकडील मार्गावर पहाटे ५:४० च्या सुमारास घडली. MH01EL6366 या नोंदणी क्रमांकाची ही मोटार सायकल असल्याचा दावा फ्री प्रेस जर्नलने केला आहे.
अपघातामुळे वर्दळीच्या मार्गावरील वाहतुकीत थोडा व्यत्यय आला, त्याचवेळी पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी पुढील तपास सुरू केला. अधिकारी घटनेचा नेमका क्रम आणि अतिवेग व सिग्नल उल्लंघनामुळे हा प्राणघातक अपघात झाला का, याची तपासणी करत आहेत. मृतांची ओळख अद्याप अधिकृतपणे निश्चित झालेली नाही.
