गेल्या अनेक वर्षांपासून एल्फिन्स्टन आणि परळ या दोन स्थानकांदरम्यान नवा पूल बांधण्याची मागणी प्रलंबित होती. या मागणीला अखेर मंजुरी देण्यात आलीये. शुक्रवारी एल्फिन्स्टन पुलावरच्या चेंगराचेंगरीत २२ लोकांचा मृत्यू झाला त्यानंतर गाढ झोपी गेलेल्या रेल्वे प्रशासनाला अखेर जाग आली आहे. ‘एएनआय’ या वृत्तवाहिनीने या संदर्भातले वृत्त दिले आहे. नव्या पुलासाठी केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी ९.५ कोटींचा निधी मंजूर केला असून लवकरच या पुलाचे काम सुरु होईल असेही रेल्वे मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.

शुक्रवारी सकाळी ऐन गर्दीच्या वेळी एल्फिन्स्टन पुलावरच चेंगराचेंगरी झाली आणि २२ जणांचा मृत्यू झाला. त्यानंतर केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी त्यांचे सगळे नियोजित कार्यक्रम रद्द करून या दुर्घटनेतील जखमींची भेट घेतली. गेल्या अनेक वर्षांपासून परळ- एल्फिन्स्टन स्टेशन्स दरम्यान अतिरिक्त पूल बांधला जावा अशी मागणी प्रवासी संघटना आणि प्रवाशांकडूनही होत होती. अखेर २२ बळी गेल्यावर रेल्वे मंत्रालयातर्फे या दोन स्टेशन्सवरील अतिरिक्त पुलाला मंजुरी देण्यात आलीये.

शुक्रवारी घडलेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेमुळे मुंबईतील रेल्वे कर्मचाऱ्यांनी दसरा हा सण साजरा करू नये अशी विनंती केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी केलीये. या संदर्भातील ट्विट ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेने ट्विट केला आहे. तसेच येत्या सात दिवसांमध्ये सगळ्या उपनगरांतील रेल्वे स्थानकांची पाहणी केली जाईल आणि ज्या ठिकाणी असे अरुंद पूल किंवा कमी पूल आहेत तिथे वेगाने काम सुरु केले जाईल अशी माहितीही पियुष गोयल यांनी दिली.