मुंबई : शैक्षणिक वर्ष २०२४-२५ आरटीईअंतर्गत २५ टक्के आरक्षित जागांसाठीच्या सोडतीची निवड यादी शनिवार, २० जुलै रोजी प्रसिद्ध करण्यात आली. या सोडतीनुसार मुंबई शहर आणि उपनगरातील ३३८ पात्र शाळांमध्ये एकूण ९ हजार ८९४ अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी ४ हजार ७३५ विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. येत्या २२ जुलैपासून या सोडतीद्वारे निवड झालेल्या बालकांच्या पालकांना त्यांनी नोंदणी केलेल्या मोबाइल क्रमांकावर सोमवार संदेश येण्यास सुरुवात होईल. आरटीईअंतर्गत दुर्बल, वंचित, शैक्षणिक व सामाजिकदृष्ट्या मागासवर्ग घटकांकरिता विद्यार्थ्याच्या घरापासून १ किलोमीटर अंतरावरील खासगी शाळेत २५ टक्के आरक्षित कोट्यातून मोफत प्रवेश दिले जातात. त्यानुसार, मुंबईतील ३३८ पात्र शाळांमधील आरटीईच्या २५ टक्के मोफत प्रवेश देण्यात येत आहे. या प्रवेशासाठी महाराष्ट्र शासनाच्या या संकेतस्थळावरून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले होते. त्यापैकी निवड झालेल्या विद्यार्थ्यांची यादी शनिवारी या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली. उच्च न्यायालय मुंबई यांनी जनहित याचिका व रिट याचिकेवर शुक्रवारी अंतिम निर्णय दिला. शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये शिक्षण हक्क अधिनियमानुसार दुर्बल व वंचित घटकाकरिता २५ टक्के ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेच्या सोडतीची निवड व प्रतीक्षा यादी शनिवारी प्रसिद्ध करण्यात आली. हेही वाचा - ‘नीट’चा केंद्र व शहरनिहाय निकाल जाहीर, न्यायालयाच्या आदेशानंतर पुन्हा निकाल जाहीर हेही वाचा - दाऊद दहशतवादी घोषित म्हणून त्याच्याशी संबंधितांवर युएपीएअंतर्गत कारवाई नको – उच्च न्यायालयाची महत्त्वपूर्ण टिप्पणी प्रवेश मिळाल्याचा संदेश प्राप्त झालेल्या पालकांनी संकेतस्थळावरून प्रवेश पत्राची प्रिंट घ्यावी. प्रवेशपत्रावर दिलेल्या संबंधित पडताळणी समितीकडे आवश्यक कागदपत्रे आणि त्यांच्या छायांकित प्रती घेऊन जावे. समितीने प्रवेश निश्चित केल्यानंतर पालकांनी प्रत्यक्ष प्रवेशासाठी शाळेत जाणे आवश्यक आहे. तसेच, पालकांनी केवळ एसएमएसवर अवलंबून न राहता संबंधित संकेतस्थळावर अर्जाची स्थिती या टॅबवर आपल्या पाल्याचा अर्ज क्रमांक टाकून त्याचा प्रवेश निश्चित झाला आहे की नाही याची पडताळणी करून घ्यावी, असे आवाहन शिक्षणाधिकारी राजेश कंकाळ, व शिक्षणाधिकारी राजू तडवी यांनी केले आहे.