मुंबई : कूपर आणि नायर रुग्णालयांमध्ये निवासी डॉक्टरांवर झालेल्या हल्ल्यांनंतर मुंबई महानगरपालिकेने प्रमुख रुग्णालयांतील सुरक्षा अधिक मजबूत करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार केईएम, शीव, नायर आणि कूपर या रुग्णालयांमधील सुरक्षा व्यवस्थेचे दर आठवड्याला लेखापरीक्षण करण्यात येणार आहे. यासंदर्भातील सूचना संबंधित रुग्णालयांच्या अधिष्ठातांना देण्यात आल्या आहेत.

मागील आठवड्यामध्ये कूपर रुग्णालयातील तीन डॉक्टरांवर रुग्णाच्या कुटुंबाने हल्ला केला. या हल्ल्यामुळे निवासी डॉक्टरांनी चार दिवस सामूहिक रजा आंदोलन केले. त्यामुळे रुग्णालयातील संपूर्ण रुग्णसेवा ठप्प झाली. हे आंदोलन मागे घेण्यात आले त्याच दिवशी नायर रुग्णालयामध्ये एका निवासी डॉक्टर महिलेला रुग्णाच्या कुटुंबाच्या रोषाचा सामाेरे जावे लागले.

या घटनांना आळा घालण्यासाठी आणि डॉक्टरांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून प्रमुख रुग्णालयातील सुरक्षा व्यवस्थेचे दर आठवड्याला लेखा परीक्षण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यामध्ये नियमित देखरेख प्रणाली तयार करणे, जबाबदारी वाढवणे आणि सुरक्षितता सुधारणांबाबत डेटा-आधारित निर्णय घेण्यास सक्षम करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे महापालिका उपायुक्त शरद उघाडे यांनी सांगितले. संबंधित रुग्णालयाच्या अधिष्ठातांना दर आठवड्याला केलेल्या सुरक्षा लेखा परीक्षणाचा अहवाल महानगरपालिकेच्या उपायुक्तांना (आरोग्य) सादर करावा लागणार आहे.

केईएम, शीव, नायर आणि कूपर या वैद्यकीय महाविद्यालये आणि रुग्णालयांमध्ये सुमारे ३ हजार ५०० निवासी डॉक्टर कार्यरत आहेत. या चारही वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये ६०० हून अधिक सुरक्षा कर्मचारी तैनात आहेत. प्रत्येक वैद्यकीय महाविद्यालयात सुमारे १५० ते २०० सीसी टीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. रुग्णालयांमध्ये सुरक्षिततेसाठी या उपाययोजना करण्यात आल्या आहेत. मात्र असूनही, निवासी डॉक्टरांना असुरक्षित वाटत आहे.

चार वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये ४० असुरक्षित ठिकाणे

मुंबई महानगरपालिकेच्या केईएम, शीव, नायर आणि कूपर या चार वैद्यकीय महाविद्यालयांमधील निवासी डॉक्टरांची संघटना असलेल्या ‘बीएमसी मार्ड’ने ऑगस्ट २०२४ मध्ये परिसरांचे सुरक्षा लेखा परीक्षण केले. यावेळी या चारही रुग्णालयांमध्ये ४० ठिकाणे असुरक्षित असल्याचे आढळले. ही ठिकाणे अद्यापही असुरक्षित आहेत. या ४० असुरक्षित ठिकाणांपैकी नायर रुग्णालयामध्ये १२, शीव रुग्णालयामध्ये १०, तर केईएम व कूपर रुग्णालयामध्ये १८ ठिकाणे आहेत.