मुंबई : मुंबई – अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी अखंडित वीजपुरवठा सुनिश्चित करण्याच्या दृष्टीने संपूर्ण ५०८ किमी लांबीच्या मार्गावर १४ ट्रॅक्शन सबस्टेशन्स (टीएसएस) उभारण्यात येत आहेत. यापैकी गुजरातमधील नवसारी जिल्ह्यातील बिलिमोरा येथील पहिले सबस्टेशन अंतिम टप्प्यात पोहोचले आहे. या सबस्टेशन्सच्या माध्यमातून ग्रीडमधून वीज घेऊन तिचे आवश्यक व्होल्टेजमध्ये रूपांतर केले जाणार असून त्यानंतर बुलेट ट्रेनच्या ओव्हरहेड वायर यंत्रणेला वीजपुरवठा केला जाणार आहे.

मुंबई – अहमदाबाद बुलेट ट्रेनसाठी महाराष्ट्रात पाच, तर गुजरातमध्ये नऊ ट्रॅक्शन सबस्टेशन्स निर्माण केली जात आहेत. महाराष्ट्रातील मुंबई, ठाणे, विरार, बोईसर आणि ठाणे डेपो येथे ही सबस्टेशन्स असतील. गुजरातमधील वापी, बिलिमोरा, सुरत, भरूच, वडोदरा, आणंद, महेमदाबाद, अहमदाबाद आणि साबरमती डेपो येथे त्यांची उभारणी करण्यात येत आहे. बिलिमोरा येथील सुमारे १८ हजार चौ.मी. क्षेत्रफळावर उभारण्यात येणाऱ्या सबस्टेशनचे बांधकाम वेगाने सुरू आहे. कंट्रोल पॅनेल, चेंजओव्हर स्विच, ट्रान्सफॉर्मर आणि सर्किट ब्रेकर इमारतीतील उपकरणांची स्थापना पूर्ण झाली आहे. तसेच सर्व गॅन्ट्री टॉवर्स आणि बीम बसविण्याचे कामही पूर्ण करण्यात आले आहे. सध्या उपकरणांच्या चाचण्या आणि कमिशनिंगशी संबंधित कामे सुरू आहेत.

गुजरातमधील सबस्टेशन्सना गुजरात एनर्जी ट्रान्समिशन कॉर्पोरेशन लिमिटेडच्या (जीईटीसीओ) २२० केव्ही अंबेथा ग्रीड सबस्टेशनमधून वीजपुरवठा केला जाणार आहे. त्यानंतर अत्याधुनिक २ बाय २५ केव्ही ट्रॅक्शन पॉवर सप्लाय प्रणालीद्वारे व्हायाडक्टवर बसविण्यात आलेल्या ओव्हरहेड इक्विपमेंटला (ओएचई) वीज दिली जाईल. संपूर्ण वीजपुरवठा यंत्रणेचे केंद्रीकृत नियंत्रण केंद्रातून रिअल-टाइम मॉनिटरिंग करण्यात येणार आहे. त्यामुळे बुलेट ट्रेनच्या संचालनासाठी आवश्यक असलेल्या वीजपुरवठ्याचे नियंत्रण आणि देखरेख एकाच केंद्रातून करणे शक्य होणार आहे.

या प्रकल्पातील अनेक महत्त्वाचे विद्युत घटक आता देशातच तयार होत आहेत. ट्रान्सफॉर्मर, ओएचई मास्टवरील क्रॉस-आर्म, ग्राऊंड वायर, प्रोटेक्शन वायर, फीडर वायर; तसेच ट्रॅक्शन पॉवर सप्लाय आणि वितरण प्रणालीतील अनेक उपकरणांचे उत्पादन भारतातच सुरू आहे. त्यामुळे उच्च-गती रेल्वे तंत्रज्ञानाचे देशांतर्गत हस्तांतरण होऊन उद्योगांना चालना, रोजगारनिर्मिती आणि आयातीवरील अवलंबित्व कमी होणार आहे.

प्रकल्पातील सर्व १४ ट्रॅक्शन सबस्टेशनवर भूकंप पूर्वसूचना प्रणाली बसवली जाणार आहे. एकूण २८ सिस्मोमीटर बसवले जात असून, त्यापैकी १२ महाराष्ट्रात आणि १६ गुजरातमध्ये असतील. भूकंपाची हालचाल ओळखताच काही सेकंदांतच ट्रेन थांबवण्याची क्षमता या प्रणालीत असेल.