मुंबई : जपानने साठच्या दशकात अवघ्या साडेपाच वर्षांत बुलेट ट्रेन सुरू करून जगाला वेगवान रेल्वे प्रवासाची दिशा दाखवली, मात्र भारतात गेल्या नऊ वर्षांपासून बुलेट ट्रेनची उभारणी कासवगतीने सुरू आहे. मुंबई ते अहमदाबाददरम्यान प्रत्यक्ष बुलेट ट्रेन धावण्यास आणखी तीन वर्षे लागतील. या काळात बुलेट ट्रेन उभारणीचा खर्चही दुप्पट झाला असून ताशी ३२० किमी वेगाने धावणार्‍या या ट्रेनच्या उभारणीला दर किमीमागे चारशे कोटींहून अधिक खर्च होण्याची शक्यता आहे.

जपानने १९५९ मध्ये टोकाइदो शिंकान्सेन प्रकल्पाच्या बांधकामाला सुरुवात केली आणि ऑक्टोबर १९६४ मध्ये टोकियो ऑलिम्पिकच्या तोंडावर जगातील पहिली बुलेट ट्रेन सुरू केली. सुमारे ५१५ किमी लांबीच्या या मार्गाने जपानच्या विकासाला भरारी दिलीच, पण वेगवान रेल्वेप्रवासाचे साध्य जगासमोर मांडले. भारतानेही हा आदर्श घेत २०१७मध्ये मुंबई ते अहमदाबाददरम्यान ५०८ किमी लांबीची बुलेट ट्रेन सुरू करण्याचे ध्येय समोर ठेवले. त्यावेळी २०२२ मध्ये ही बुलेट ट्रेन धावेल, असे जाहीर करण्यात आले. मात्र, ती मुदत कधीचीच टळली. आता मुंबई-साबरमती मार्ग डिसेंबर २०२९ पर्यंत पूर्ण होईल, असे सांगण्यात येत आहे.

या संपूर्ण प्रकल्पासाठी सुरुवातीला १.०८ लाख कोटी रुपये खर्च अपेक्षित होता, मात्र विविध कारणांमुळे झालेला विलंब आणि बांधकामातील गुंतागुंत यांमुळे खर्चवाढीचा प्रश्न ऐरणीवर आला. आता या प्रकल्पाचा खर्च २.१० लाख कोटींवर पोहोचण्याचा अंदाज आहे. म्हणजेच, मूळ प्रकल्प खर्चाच्या दुप्पट खर्च. त्यामुळे भारतातील प्रतिकिमी खर्च सुमारे ४१३ कोटी रुपये होतो. प्रकल्पाचा अंतिम खर्च, तिकीटदर, अपेक्षित प्रवासीसंख्या आणि देखभाल खर्च यांचा ताळमेळ महत्त्वाचा ठरणार आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि वेगवान प्रवासाची सुविधा उपलब्ध होणार असली, तरी त्यातून देशाला किती आर्थिक लाभ होईल, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.

४५७ किमीचे पिअर्स; १०२ किमी ट्रॅक जोडणी

नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडने (एनएचएसआरसीएल) दिलेल्या प्रगती अहवालानुसार, २० ऑक्टोबर २०२६ पर्यंत मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन मार्गावर ४५७ किमी लांबीचे काँक्रीटचे खांब अर्थात ‘पियर्स ’आणि ३७४ किमीचे जोडणीपूल अर्थात ‘व्हायाडक्ट’चे काम पूर्ण झाले आहे. बुलेट मार्गावरील ३०२ किमी अंतरावर ध्वनिरोधक भिंती बसवण्यात आल्या असून, त्यांची संख्या सहा लाखांहून अधिक आहे. गुजरातमधील साबरमती आणि सुरत; तसेच महाराष्ट्रातील ठाणे येथील बुलेट ट्रेनच्या देखभाल आणि उभ्या करण्यासाठीच्या डेपोची कामे सुरू आहेत. मात्र, या विविध कामांची प्रगती म्हणजे संपूर्ण मार्गावर रेल्वे सुरू करण्याची तयारी पूर्ण झाली, असे नाही. उर्वरित बांधकाम, विद्युत यंत्रणा, सिग्नलिंग, चाचण्या आणि सुरक्षिततेच्या मंजुर्‍या पूर्ण कराव्या लागणार आहेत.