मुंबई : मुंबई शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल उचलण्यात येत आहे. बेस्ट आणि बुलेट ट्रेन प्रकल्प यांना थेट जोडण्याचे विचाराधीन आहे. यामुळे प्रवाशांना बुलेट ट्रेन स्थानकांपर्यंत पोहोचणे अधिक सोपे होणार आहे. बेस्टसह इतर सार्वजनिक वाहतूक सेवा, टॅक्सी, रिक्षा यांची जोडणी केली जाईल.

नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडच्या (एनएचएसआरसीएल) माध्यमातून राबवण्यात येत असलेल्या मुंबई -अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या पार्श्वभूमीवर, बेस्ट बस सेवा थेट स्थानकांशी जोडण्याची योजना आखली जात आहे. मुंबईत वांद्रे – कुर्ला संकुल येथे बुलेट ट्रेनचे स्थानक होणार आहे. या बुलेट ट्रेन स्थानकांच्या परिसरात विशेष बस मार्ग, फीडर सेवा आणि वाढीव फेऱ्यांचा समावेश असणार आहे. या उपक्रमामुळे प्रवाशांना स्थानकात ये-जा करण्यासाठी अधिक सुलभ आणि परवडणारा पर्याय उपलब्ध होईल. विशेषतः कामगार, विद्यार्थी आणि दररोज प्रवास करणाऱ्या नागरिकांसाठी ही सुविधा मोठा दिलासा ठरणार आहे.

तसेच, शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासही या निर्णयाचा फायदा होण्याची शक्यता आहे. बेस्टच्या विद्युत बस आणि बुलेट ट्रेन यांचा समन्वय साधल्यास पर्यावरणपूरक आणि जलद प्रवासाला चालना मिळेल, असे मत वाहतूक तज्ञांनी व्यक्त केले आहे. दरम्यान, संबंधित यंत्रणांकडून मार्ग नियोजन आणि वेळापत्रकाबाबत लवकरच अंतिम निर्णय अपेक्षित असून, प्रकल्पाच्या पुढील टप्प्यात ही सेवा सुरू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

शहराच्या वाहतूक व्यवस्थेशी एकरूप होऊन बुलेट ट्रेन स्थानके आधुनिक शहरी वाहतूक जाळ्याचा एक महत्त्वाचा भाग बनतील. प्रवाशांचा प्रवास सोयीस्कर करून देण्यासाठी बुलेट ट्रेन स्थानकांवर मल्टी-मोडल इंटिग्रेशन सुविधा आणि आधुनिक स्थानक प्लाझा बांधले जात आहेत. या विकासकामांची रचना स्थानकावर सहज प्रवेश आणि बुलेट ट्रेन स्थानक व स्थानिक वाहतुकीसाठी सोयीस्कर असेल.

या उपक्रमांतर्गत, बुलेट ट्रेन स्थानकांच्या सभोवतालचा परिसर पूर्णपणे विकसित केला जाईल. बस, टॅक्सी, खासगी वाहने व सार्वजनिक वाहतूक यासारख्या इतर वाहतूक प्रणालींशी जोडला जाईल. यामुळे कनेक्टिव्हिटी सुधारेल आणि प्रवाशांना एक सुरक्षित, सोयीस्कर व संघटित वाहतूक वातावरण मिळेल.

स्थानक प्लाझाची रचना शहरानुसार ठरवली जाईल. ज्या भागात प्रवाशांची रहदारी अधिक, तिथे सुव्यवस्थित जागा तयार केली जाईल. ज्यामुळे प्रवाशांचा प्रवास सुलभ होईल. वाहनतळ, सार्वजनिक आणि खासगी वाहनांसाठी पिकअप आणि ड्रॉप-ऑफ झोन, रस्त्यांचे सुशोभीकरण, सुधारित पादचारी मार्ग, माहितीपूर्ण फलक, आधुनिक पथदिवे, सीसीटीव्ही-आधारित निगराणी, लँडस्केपिंग आणि वृक्षारोपण, प्रवाशांची सुरक्षितता आणि सोयीसाठी सार्वजनिक सुविधा आणि प्रगत अग्निशमन प्रणालींचाही समावेश केला जाईल, अशी माहिती नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडच्या (एनएचएसआरसीएल) वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.