मुंबई : मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या उभारणीतील महत्त्वाचा टप्पा गाठण्यात आला असून भारतातील रेल्वे बोगद्याच्या खाणकामासाठी वापरल्या जाणाऱ्या सर्वात मोठ्या टनेल बोरिंग मशीन (टीबीएम)द्वारे विक्रोळी येथून रविवारी बोगदा खोदकामाला सुरुवात करण्यात आली आहे. हे अत्याधुनिक टीबीएम विक्रोळी शाफ्टपासून बांधकामाधीन मुंबई बुलेट ट्रेन स्थानक (बीकेसी)च्या दिशेने भूमिगत बोगद्याचे खोदकाम करणार आहे.
या प्रकल्पातील एकूण २१ किमी बोगद्यापैकी सावली (घणसोली) ते वांद्रे-कुर्ला संकुल (बीकेसी) दरम्यानचा १६ किमीचा भाग टीबीएमच्या साहाय्याने खोदण्यात येणार असून उर्वरित ५ किमीचा भाग न्यू ऑस्ट्रियन टनलिंग पद्धतीने (एनएटीएम) पद्धतीने आधीच पूर्ण करण्यात आला आहे. विक्रोळीतून सुरू झालेले टीबीएम बुलेट ट्रेनच्या अप आणि डाऊन मार्गासाठी ६ किमी लांबीच्या एकल-नलिका बोगद्याचे खोदकाम करेल. हा बोगदा बहुमजली इमारती, प्रमुख रस्ते, मिठी नदी आणि इतर महत्त्वाच्या पायाभूत सुविधांखालून जाणार आहे.
हे टीबीएम १३.६ मीटर व्यासाच्या विशाल कटरहेडसह, सुमारे ३,१०० टन वजनाचे आणि ९६ मीटर लांबीचे आहे. या यंत्रामध्ये कटर व्हील, मेन बेअरिंग, जॉ क्रशर, इरेक्टर, मेन शिल्ड, टेल शिल्ड आणि चार विशेष गॅन्ट्रींचा समावेश असून कटर व्हील प्रति मिनिट चार फेऱ्यांच्या वेगाने कार्य करते.
प्रकल्पासाठी ‘मिक्सशिल्ड टीबीएम’ या अत्याधुनिक स्लरी-आधारित तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. मिश्र भूस्तर आणि उच्च भूजल दाबाच्या परिस्थितीत सुरक्षित उत्खनन करण्यासाठी हे तंत्रज्ञान उपयुक्त मानले जाते. दाबयुक्त बेंटोनाइट स्लरीच्या साहाय्याने बोगद्याचा अग्रभाग स्थिर ठेवला जात असल्याने दाट लोकवस्तीच्या भागात जमिनीचे खचणे नियंत्रित राहते आणि पृष्ठभागावरील परिणामही कमी होतो.
या यंत्राचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे बोगदा खोदकाम आणि काँक्रीट सेगमेंट रिंगची उभारणी ही दोन्ही कामे एकाच वेळी केली जातात. त्यामुळे सुरक्षितता वाढण्याबरोबरच बांधकामाचा वेगही लक्षणीयरीत्या वाढतो. टीबीएम कार्यान्वित करण्यासाठी विक्रोळी येथे तब्बल ५६ मीटर खोल शाफ्ट उभारण्यात आला आहे. येथे जल प्रक्रिया प्रकल्प, स्लरी प्रक्रिया प्रकल्प, बेंटोनाइट साठवण टाक्या, वीज उपकेंद्र, बॅकअप जनरेटर, रेडी-मिक्स काँक्रीट प्रकल्प, स्लरी वाहतूक प्रणाली, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प आणि अन्य आवश्यक पायाभूत सुविधा उभारण्यात आल्या आहेत.
बोगदा खोदकामादरम्यान परिसरातील इमारती आणि इतर संरचनांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी अत्याधुनिक रिअल-टाइम मॉनिटरिंग प्रणाली बसविण्यात आली आहे. त्यात सरफेस सेटलमेंट पॉइंट्स, ऑप्टिकल डिस्प्लेसमेंट सेन्सर्स, थ्री-डी टार्गेट्स, स्ट्रेन गेजेस आणि सिस्मोग्राफच्या माध्यमातून सातत्याने निरीक्षण केले जाणार आहे.
दरम्यान, ठाणे जिल्ह्यातील महापे येथील ११.१७ हेक्टर क्षेत्रावरील कास्टिंग यार्डमध्ये बोगद्याच्या लाइनिंगसाठी आवश्यक ७७ हजार काँक्रीट सेगमेंट्स तयार करण्याचे काम सुरू आहे. या सेगमेंट्सपासून ७,७०० टनेल रिंग तयार करण्यात येणार असून प्रत्येक रिंगचे वजन सुमारे १०० टन आहे.
संपूर्ण बोगदा पूर्णपणे जलरोधक राहावा, यासाठी डबल-लेयर ईपीडीएम गॅस्केट्स आणि हायड्रोफिलिक सील्सचा वापर करण्यात येत आहे. दीर्घकालीन टिकाऊपणा आणि सुरक्षिततेसाठी संपूर्ण संरचनेवर सातत्याने रिअल-टाइम देखरेख ठेवली जाणार आहे. या अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे मुंबई–अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या भूमिगत बोगद्याच्या बांधकामाला गती मिळणार असल्याची माहिती नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (एनएचएसआरसीएल) च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.
