मुंबई : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम वेगाने सुरू असून जूनअखेरीस प्रकल्पातील अनेक महत्त्वाचे टप्पे पूर्ण झाले आहेत. ५०८ किमी लांबीच्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामध्ये ३५६ किमी व्हायाडक्टचे, तर ४५२ किमी पिअर (खांब) उभारणीचे काम पूर्ण झाले आहे. तसेच, ५ जुलै रोजी विक्रोळी येथे टनेल बोरिंग यंत्राच्या (टीबीएम) साहाय्याने भुयारीकरणास सुरुवात होणार आहे.

नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडच्या (एनएचएसआरसीएल) मुंबई – अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाअंतर्गत सुरू असलेल्या २१ किमी लांबीच्या बोगदा प्रकल्पासाठी मे महिन्यात विक्रोळी येथील शाफ्टमध्ये पहिल्या टीबीएमचे कटरहेड उतरविले होते. याच महिन्यात दुसरी टीबीएम घणसोली येथील सावली शाफ्ट येथून विक्रोळीच्या दिशेने उतरविण्यात आली होती. विक्रोळी येथील टीबीएम विक्रोळीहून सुमारे ६ किमी प्रवास सुरू करून दाट शहरी भाग आणि मिठी नदीखालून वांद्रे-कुर्ला संकुल येथील बांधकामाधीन मुंबई बुलेट ट्रेन स्थानकापर्यंत पोहोचेल. दुसऱ्या टीबीएमचे कटरहेड घणसोली येथील सावली शाफ्टमध्ये यशस्वीरित्या उतरविण्यात आले आहे.

३ हजार टनांहून अधिक वजनाच्या दोन टीबीएम यंत्राची जोडणी पूर्ण झाली आहे. १३.६ मीटर व्यास आणि सुमारे ३५० टन वजन असलेला हा कटरहेड टीबीएमच्या मुख्य शिल्ड असेंब्लीतील अत्यंत महत्त्वाचा घटक मानला जातो.

वांद्रे-कुर्ला संकुल ते शीळफाट्यादरम्यान २१ किमीचा बोगदा खोदला जाईल. बोगदा खोदण्यासाठी टीबीएम आणि न्यू ऑस्ट्रीयन टनेलिंग पद्धत अशा दोन्ही पद्धतीचा वापर केला जाईल. २१ किमी बोगद्यापैकी ७ किमीचा भाग ठाणे खाडीतील असेल. घणसोली ते शीळफाटा दरम्यानचा सुमारे पाच किमी अंतराचा बोगदा न्यू ऑस्ट्रियन टनलिंग पद्धतीने (एनएटीएम) तयार केला गेला. तर, या प्रकल्पातील घणसोली ते वांद्रे-कुर्ला संकुल पर्यंत १६ किमी लांबीचा बोगदा खोदण्याचे काम टीबीएममार्फत केले जाईल. टीबीएमद्वारे ७ किमी ठाणे खाडीतील भुयारीकरणाचे काम केले जाईल. रेल्वे बोगदा बांधकामासाठी देशात प्रथमच एवढ्या मोठ्या टीबीएमचा वापर केला जात आहे.

प्रकल्पांतर्गत आतापर्यंत १७ नदी पुलांचे, ५ प्री-स्ट्रेस्ड काँक्रीट पुलांचे आणि १४ स्टील पुलांचे बांधकाम पूर्ण झाले आहे. तसेच २९६ किमी मार्गावर ५.९ लाखांहून अधिक ध्वनिरोधक बसविण्यात आले आहेत. रेल्वे मार्गाच्या बांधकामातही मोठी प्रगती झाली असून २०९ रूट किमी (४१८ ट्रॅक किमी) आरसी ट्रॅक बेडचे काम पूर्ण झाले आहे. १९८ रूट किमीसाठी ट्रॅक स्लॅबचे उत्पादन पूर्ण झाले असून ८५ रूट किमीवर ट्रॅक स्लॅब टाकून त्यामध्ये सिमेंट ॲस्फाल्ट मॉर्टार इंजेक्शनचे कामही पूर्ण करण्यात आले आहे.

विद्युतीकरणाच्या कामालाही गती मिळाली असून मुख्य मार्गावरील सुमारे १९६ रूट किमी अंतरावर ८,८०० हून अधिक ओव्हरहेड इलेक्ट्रिफिकेशन (ओएचई) उभारण्यात आले आहेत. बोगद्यांच्या कामात गुजरातमधील वलसाड येथे असलेला एकमेव पर्वतीय बोगदा पूर्ण झाला आहे. पालघर जिल्ह्यातील सात पर्वतीय बोगद्यांपैकी तीन बोगद्यांचे ”ब्रेकथ्रू” यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आले आहे. याशिवाय, गुजरातमधील साबरमती आणि सुरत; तसेच ठाणे येथे उभारण्यात येणाऱ्या तिन्ही रोलिंग स्टॉक डेपोचे बांधकाम प्रगतिपथावर आहे. प्रकल्पातील सर्व १२ बुलेट ट्रेन स्थानकांवर काम सुरू असून गुजरातमधील आठ स्थानकांवर अंतिम टप्प्यातील कामे वेगाने सुरू आहेत, अशी माहिती नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडच्या (एनएचएसआरसीएल) वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.