मुंबई : देशातील पहिल्या मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या सुरक्षेकरिता कमी परिचालन खर्चासह रेल्वे सुरक्षेतील अनुभवामुळे केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाऐवजी (सीआयएसएफ) रेल्वे सुरक्षा दलाला (आरपीएफ) रेल्वे प्रशासनाने पसंती दर्शविली आहे. बुलेट ट्रेन आणि प्रवाशांच्या सुरक्षेसाठी ५०० आरपीएफ जवान आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाची मदत घेण्यात येणार आहे.
मुंबई-अहमदाबाद मार्गावरील बुलेट ट्रेनची कामे सध्या वेगाने सुरु आहेत.राज्यातील बीकेसीतील भूमिगत स्थानकांसह ठाण्याच्या खाडीखालील भूमिगत बोगद्याचे काम देखील प्रगतीपथावर आहे. १५ ऑगस्ट २०२७ रोजी सुरत ते वापी दरम्यान बुलेट ट्रेन धावण्याची शक्यता आहे. मुंबई ते अहमदाबाद हा पूर्ण मार्ग २०२९ पर्यंत सुरू करण्याचे रेल्वेचे नियोजन आहे.
मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन कॉरिडॉरच्या सुरक्षेची जबाबदारी रेल्वे संरक्षण दलाकडे (आरपीएफ) सोपवली जाण्याची शक्यता आहे. मात्र सध्या या प्रस्तावावर चर्चा सुरू असून, तैनातीची आवश्यकता, कार्यान्वयन कार्यक्षमता आणि सुरक्षेचा खर्च यांचे मूल्यांकन केल्यानंतर अंतिम आराखडा तयार केला जाणार आहे. यापूर्वी ५०८ किलोमीटर लांबीच्या बुलेट ट्रेनकरिता केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (सीआयएसएफ) तैनातीचा विचार सुरू होता.
सीआयएसएफ ने संपूर्ण मार्गाचे सविस्तर सर्वेक्षण केल्यानंतर सुरक्षा तैनातीसाठी सुमारे २,२०० ते २,३०० जवानांची आवश्यकता असल्याचा अंदाज व्यक्त केला. मात्र, अधिकाऱ्यांच्या मते, रेल्वे प्रशासन आता सुमारे ५५० आरपीएफ कर्मचाऱ्यांसह अधिक सुटसुटीत आणि तंत्रज्ञान-आधारित सुरक्षा यंत्रणेचा विचार करत आहे. सूत्रांनी सांगितले की, रेल्वे सुरक्षेचा विद्यमान अनुभव आणि तुलनेने कमी परिचालन खर्चामुळे हा प्रस्ताव रेल्वे सुरक्षा दलाच्या (आरपीएफ) बाजूने आहे.
तीन प्रमुख आरपीएफ पोलिस ठाणी
प्रस्तावित योजनेअंतर्गत, बुलेट ट्रेन कॉरिडॉरवर तीन प्रमुख आरपीएफ पोलीस ठाणी स्थापन केली जाऊ शकतात. यांपैकी दोन गुजरातमध्ये अहमदाबाद आणि सुरत येथे, तर एक मुंबईच्या वांद्रे परिसरात प्रस्तावित आहे. ही सुरक्षा केंद्रे कॉरिडॉरवरील सर्व १२ स्थानकांवरील संरक्षण आणि निगराणी व्यवस्थेमध्ये समन्वय साधतील. एकात्मिक नियंत्रण कक्ष, स्मार्ट कॅमेरे, सेन्सर्स आणि रिअल-टाइम पाळत ठेवणाऱ्या प्रणालींद्वारे या कॉरिडॉरवर देखरेख ठेवली जाण्याची शक्यता आहे.
बुलेट ट्रेन वैशिष्ट्ये
मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन जपानच्या शिंकांसेन तंत्रज्ञानाचा वापर करून विकसित केला जात असलेला भारतातील पहिला हाय-स्पीड रेल्वे कॉरिडॉर आहे. ५०८ किलोमीटरचा हा मार्ग महाराष्ट्र आणि गुजरातला जोडणार आहे. या मार्गावर बुलेट ट्रेन ताशी ३२० किलोमीटरच्या कमाल वेगाने धावणार असल्याने मुंबई -अहमदाबाद दरम्यानचा प्रवास दोन तासात पूर्ण होईल.
