मुंबई : मुंबई – अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पात भारतीय रेल्वेच्या इतिहासात प्रथमच चल क्रॉसिंगयुक्त (स्विंग-नोज) उच्चगती रेल्वे फाट्यांचा वापर करण्यात येत आहे. ताशी ३२० किमी वेगाने धावणाऱ्या बुलेट ट्रेनच्या सुरक्षित, सुरळीत संचालनासाठी ही यंत्रणा महत्त्वाची ठरणार असून, पारंपरिक स्थिर क्रॉसिंग असलेल्या रेल्वे फाट्यांच्या तुलनेत हा मोठा तांत्रिक बदल मानला जात आहे.
पारंपरिक रेल्वे फाट्यांमध्ये क्रॉसिंगच्या टोकाशी चाकाला ओलांडावा लागणारा एक मोकळा भाग असतो. उच्च वेगाने धावताना या भागामुळे चाक आणि रुळांमध्ये तीव्र धक्के, कंपन, आवाज आणि झीज वाढते. तसेच रुळांमध्ये किरकोळ अनियमितता असल्यास चाकाच्या हालचालीवरही परिणाम होण्याचा धोका असतो. चल क्रॉसिंगयुक्त यंत्रणेत मात्र क्रॉसिंगचे टोक आवश्यकतेनुसार सरकविले जाते. त्यामुळे बुलेट ट्रेनच्या चाकांना संपूर्ण फाट्यावर अखंड आणि सलग रुळाचा आधार मिळतो. परिणामी, धक्के आणि कंपन लक्षणीयरित्या कमी होतात, डब्यांतील आवाज घटतो, चाके आणि रुळांची झीज कमी होते, तसेच सुरक्षितता आणि देखभाल व्यवस्थेत सुधारणा होते.
दुहेरी बिंदू यंत्रणा
प्रत्येक उच्चगती रेल्वे फाट्यावर दोन स्वतंत्र बिंदू यंत्रांचा वापर करण्यात आला आहे. यापैकी एक यंत्र फाट्याच्या सुरुवातीच्या रुळाला योग्य स्थितीत आणून कुलूपबंद करते, तर दुसरे यंत्र चल क्रॉसिंगचे टोक योग्य स्थितीत आणून सुरक्षितपणे बंदिस्त करते. दोन्ही यंत्रणा एकाच नियंत्रण व्यवस्थेखाली समन्वयाने कार्य करतात. दोन्ही ठिकाणी योग्य स्थिती आणि कुलूपबंदी झाल्याची खात्री झाल्यानंतरच बुलेट ट्रेन त्या फाट्यावरून जाण्याची परवानगी दिली जाते.
मिलीमीटर स्तरावरील अचूकता
उच्चगती बुलेट ट्रेन फाट्यांसाठी वापरण्यात आलेल्या बिंदू यंत्रांमध्ये पारंपरिक यंत्रांच्या तुलनेत अधिक शक्तिशाली कार्यक्षमता, मिलीमीटर स्तरावरील अचूक स्थिती नियंत्रण, प्रबळ कुलूपबंदी यंत्रणा आणि भारतीय हवामानात विश्वासार्हपणे कार्य करण्याची क्षमता आहे. तसेच उच्चगती संकेत व्यवस्थेशी सुसंगत सुरक्षितता पडताळणी व्यवस्थाही त्यामध्ये समाविष्ट करण्यात आली आहे.
बहुपदरी सुरक्षितता
या यंत्रणेत स्वतंत्र पडताळणीच्या अनेक स्तरांचा समावेश करण्यात आला आहे. फाट्यावरील रुळाची अंतिम स्थिती, चल क्रॉसिंगची अंतिम स्थिती आणि दोन्ही घटकांची सुरक्षित कुलूपबंदी यांची सातत्याने तपासणी केली जाते. सर्व पडताळण्या यशस्वी झाल्यानंतरच मार्ग खुला केला जातो. मुंबई – अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पातील ही अत्याधुनिक तंत्रज्ञान प्रणाली आंतरराष्ट्रीय बुलेट ट्रेन मानकांनुसार सुरक्षितता, प्रवासाचा दर्जा, रेल्वे मालमत्तेचे दीर्घ आयुष्य आणि संचालनातील विश्वासार्हता वाढविण्यात महत्त्वाची भूमिका बजावणार असल्याचे नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडकडून (एनएचएसआरसीएल) सांगण्यात आले.
