मुंबई : देशातील पहिल्या मुंबई – अहमदाबाद बुलेट ट्रेन मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना भविष्यात पारंपरिक ऑनबोर्ड केटरिंगऐवजी स्वयंचलित व्हेंडिंग मशीनद्वारे खाद्य व पेय सेवा मिळण्याची शक्यता आहे. त्यानुसार, रेल्वे मंडळ आणि नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडद्वारे नियोजन सुरू आहे.

मुंबई – अहमदाबाद यादरम्यानचा प्रवासाचा कालावधी कमी करण्यासाठी, देशातील पहिला बुलेट ट्रेन प्रकल्प या मार्गावर तयार केला जात आहे. बुलेट ट्रेनचा प्रवास कालावधी सुमारे २ तास ७ मिनिटांचा असणार आहे. तसेच या मार्गावर ट्रेनची वारंवारता जास्त असणार आहे. त्यामुळे स्वतंत्र पॅन्ट्री कार किंवा पारंपरिक केटरिंग व्यवस्था व्यवहार्य ठरणार नाही. मुंबई – अहमदाबाद दरम्यानचे अंतर सुमारे ५०८ किमी असून या मार्गावरून ३२० किमी प्रतितास वेगाने धावणाऱ्या या सेवेसाठी जलद आणि सुलभ खाद्यसेवा देण्याच्या दृष्टीने व्हेंडिंग मशीनचा पर्याय उपलब्ध करण्याची योजना आखली आहे. या मशीनमधून प्रवाशांना थंड पेये, चहा-काॅफी तसेच रेडी – टू – ईट वेष्टनबंद खाद्यपदार्थ उपलब्ध करून दिले जाऊ शकतात. स्वयंचलित प्रणालीमुळे सेवा अधिक वेगाने मिळेल आणि ऑनबोर्ड किचन व केटरिंग कर्मचाऱ्यांशी संबंधित अडचणी कमी होतील. प्रवाशांनी अधिक सोयीस्कर आणि कार्यक्षम सेवा देण्यासाठी विविध पर्यायांचा अद्याप विचार सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली. तसेच व्हेंडिंग मशीन हा सध्या प्राधान्याचा पर्याय आहे. मात्र, प्रवाशांसाठी अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी इतर पर्यायांचाही अभ्यास सुरू आहे, असे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, याबाबत अद्याप कोणताही ठोस निर्णय झालेला नाही. सध्या बुलेट ट्रेनची पायाभूत कामे सुरू असून, ती झाल्यानंतर पुढील निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडच्या जनसंपर्क विभागाने दिली.

या प्रकल्पाचा पहिला टप्पा गुजरातमधील सुरत-वापी दरम्यानचा १०० किमीचा मार्ग असणार असून तो १५ ऑगस्ट २०२७ रोजी सार्वजनिक सेवेसाठी सुरू करण्याचे नियोजन आहे. तर, वापी – साबरमती दरम्यान डिसेंबर २०२७ पर्यंत बुलेट ट्रेन प्रकल्प पूर्ण करण्याचे नियोजन आहे. साबरमती – मुंबई विभाग डिसेंबर २०२९ पर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. या प्रारंभिक सेवेद्वारे प्रवाशांचा प्रतिसाद, सेवा प्रणाली आणि कार्यक्षमतेचे मूल्यमापन करण्यात येणार आहे. बुलेट ट्रेन सेवा दररोज ७० फेऱ्या चालवण्याचे नियोजन आहे. यामध्ये दोन्ही दिशांना प्रत्येकी ३५ फेऱ्या होतील. गर्दीच्या वेळी दर २० मिनिटांनी ट्रेन धावतील. त्यामुळे ही देशातील सर्वाधिक वारंवारतेचे धावणाऱ्या लांब पल्ल्याच्या रेल्वे सेवांपैकी एक ठरणार आहे.

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पात गुजरातमध्ये ८ आणि महाराष्ट्रात ४ अशी एकूण १२ स्थानके आहेत. यामध्ये वांद्रे-कुर्ला संकुल, ठाणे, विरार, बोईसर, वापी, बिलीमोरा, सुरत, भरूच, वडोदरा, आनंद, अहमदाबाद आणि साबरमती ही स्थानके आहेत. प्रत्येक स्थानकाचे काम वेगवेगळ्या टप्प्यात आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर दोन्ही राज्यांमधील प्रवासाचा वेळ मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे.