मुंबई: ‘मेक इन इंडिया’अंतर्गत आकाराला आलेल्या ‘वंदे भारत’ एक्स्प्रेसची शुक्रवारी पश्चिम रेल्वेवर मुंबई सेन्ट्रल-अहमदाबाद दरम्यान चाचणी करण्यात आली. प्रतितास १३० किलोमीटर वेगाने चाचणी करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र चाचणीदरम्यान सरासरी वेग प्रतितास १०५ इतका होता. लवकरच ही गाडी प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे. या गाडीमुळे मुंबईहून पाच तासांत अहमदाबाद गाठणे शक्य होणार आहे.

‘वंदे भारत’ एक्स्प्रेसची शुक्रवारी चाचणी करण्यात आली. ही गाडी अहमदाबाद येथून शुक्रवारी सकाळी ७.०६ वाजता मुंबई सेन्ट्रलकडे रवाना झाली. या गाडीने ४९२ किलोमीटर अंतर ५ तास १० मिनिटांत पार केले. यावेळी सरासरी वेग प्रतितास ९५ किलोमीटर इतको होता. त्यानंतर मुंबई सेन्ट्रलहून ही गाडी दुपारी १.१० वाजता अहमदाबादसाठी रवाना झाली. अहमदाबाद स्थानकात सायंकाळी ५.५५ वाजता ही गाडी पोहोचली. त्यादरम्यान ही गाडी सरासरी प्रतितास १०५ किलोमीटर वेगाने धावली. पावणेपाच तासांत ही गाडी अहमदाबादला पोहोचली. सध्या मुंबई – अहमदाबाद रेल्वे प्रवासासाठी साधारण सहा तास लागतात. मात्र या गाडीने सरासरा पाच तासांतच अंतर पार केले.

मुंबई – अहमदाबाद मार्गावर रेल्वेने सरासरी सहा तास प्रवासासाठी लागतात. मात्र ‘वंदे भारत’ एक्स्प्रेसने चाचणीदरम्यान सरासरी पाच तासात हे अंतर कापले. ही गाडी नियमितपणे सेवेत आल्यानंतर तिच्यावरील थांब्यांचाही सारासार विचर करण्यात येईल. त्यामुळे प्रवासाची वेळ काहीशी वाढेल. याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. ही गाडी लवकरच सेवेत दाखल होईल, असे पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमीत ठाकूर यांनी सांगितले.

सध्या चंदीगढ, नागदा या मार्गावरही ‘वंदे भारत’ एक्स्प्रेसच्या चाचण्या झाल्या आहेत. ‘वंदे भारत’ एक्स्प्रेस प्रतितास १८० किलोमीटर वेगाने धावू शकते. या गाडीत वातानुकूलित यंत्रणेत अल्ट्रा व्हायोलेट फोटोकॅटालेक्टीक एअर प्युरिफायर बसवण्यात आले असूून त्यामुळे धूळ, जंतू नष्ट होण्यास मदत होणार आहे.

 ‘वंदे भारत’ एक्स्प्रेसच्या डब्यांची बांधणी चेन्नईतील रेल्वेच्या कारखान्यात करण्यात येत आहे. जवळपास ४०० वातानुकूलित ‘वंदे भारत’ गाड्यांची बांधणी करण्यात येणार आहे. जीपीएसआधारित ऑडिओ व्हिजुअल प्रवासी माहिती प्रणालीने हे डबे सज्ज असतील. प्रत्येक ‘वंदे भारत’ एक्स्प्रेसमध्ये १६ वातानुकूलित डबे असणार आहेत. तर एका गाडीची प्रवासी क्षमता एक हजार १२८ इतकी आहे. यामध्ये आरामदायी आसने आहेत. सध्या नवी दिल्ली-वाराणसी आणि नवी दिल्ली-कटरा मार्गावर ‘वंदे भारत’ धावत आहे.