मुंबई : मागील काही वर्षांत मुंबईतील हवा प्रदूषण लक्षणीय वाढले आहे. याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. दरम्यान, शहरातील काही केंद्रांवर हवेच्या गुणवत्तेची नोंद ‘चांगल्या’ श्रेणीत होत असते. त्यामुळे शहराच्या सरासरी हवा गुणवत्ता निर्देशांकात जरी सुधारणा दिसत असली तरीही काही केंद्रांवर सातत्याने प्रदूषित हवेची नोंद होत आहे. त्यामुळे शहरातील कायमस्वरूपी प्रदूषित केंद्रे दुर्लक्षितच असून त्यावर उपाययोजना करण्याची मागणी करण्यात येत आहे.
लोकसभेत नुकत्याच हवा प्रदूषणासंबधी विचारण्यात आलेल्या दोन वेगवगेळ्या प्रश्नांना पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाकडून उत्तरे देण्यात आली. त्यात मुंबईच्या हवा प्रदूषणासंबंधी तपशील देण्यात आले. काही वर्षांच्या तुलनेत मुंबईत हवा प्रदूषणात सुधारणा होत असल्याचा दावा केला आहे. खासदार गनीबेन ठाकोर यांनी देशभरात वायू प्रदूषण नियंत्रणासाठी उपाययोजनांच्या संदर्भात तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. या प्रश्नाला दिलेल्या उत्तरात मुंबईच्या सरासरी हवा गुणवत्ता निर्देशांकात सुधारणा होत असल्याचे म्हटले आहे.
यात २०२३ मध्ये शहरात ३५ वेळा सरासरी हवा गुणवत्ता निर्देशांक ‘वाईट’ श्रेणीत नोंदवला गेला होता, तर २०२४ मध्ये दोनदा आणि २०२५ मध्ये तो एकदा ‘वाईट’ श्रेणीत नोंदवला गेला असल्याचे म्हटले आहे. प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, १४५ ते १४२ इतके दिवस हवा ‘मध्यम’ श्रेणीत नोंदवली गेली आहे. म्हणजेच तीन वर्षांत मुंबईतील बहुतांश हवा गुणवत्ता मापन केंद्रांवर प्रदूषित हवेची नोंद झाली आहे. अजूनही यात दिलासादायक सुधारणा दिसत नसून जानेवारी आणि फेब्रुवारी २०२६ मध्ये तब्बल ४३ वेळा हवेची गुणवत्ता ‘मध्यम’ श्रेणीत म्हणजे १०१ ते २०० या दरम्यान नोंदली गेली आहे. यात पीएम २.५ आणि पीएम १० चे प्रमाण सर्वाधिक आहे.
जुलैमध्ये तीन वेळा धोकादायक पातळी पावसाळ्यात नैसर्गिक स्थितीमुळे तसेच हवेचा वेग वाढल्यामुळे प्रदूषके हवेत विखुरतात आणि हवेची गुणवत्ता काहीशी सुधारते. त्यामुळे सरासरी हवेची श्रेणीही सुधारते. अर्थात ही सुधारणा तात्पुरती असल्याचे अभ्यासकांचे मत आहे. नुकताच देवनार तसेच शीवसह काही केंद्रांवर प्रदूषित हवेची नोंद झाली. यात शीव येथे जुलैमध्ये दोन वेळा ‘धोकादायक’ (३०१-४००), तर एकदा ‘अतिधोकादायक’ (४०१ ते ५००) हवेची गुणवत्ता नोंदली गेली.
देवनार हवा प्रदूषणाचा कायस्वरूपी ‘हॉटस्पॉट’
राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रमाने दिलेल्या उत्तरात मुंबईत २०१७-१८ च्या तुलनेत २०२४-२५ मध्ये शहराच्या सरासरी पीएम १० च्या पातळीत सुधारणा झाल्याचे म्हटले आहे. यात २०१७-१८ मध्ये पीएम १० चे सरासरी प्रमाण १६१ इतके होते, तर २०२४-२५ मध्ये ते ९० इतके झाले. म्हणेजच ते ४४.१ टक्क्यांनी सुधारले. मात्र, शहरातील काही केंद्रांवर हेच प्रमाण सर्वाधिक आहे. ‘रेस्म्पायर लिंविंग सायन्सेस’च्या ‘ॲटलासएक्यू’च्या अहवालानुसार, मागील तीन वर्षांत देवनार येथे प्रत्येक महिन्यात पीएम १० धूलिकणांची मात्रा अधिक नोंदली गेली. त्यामुळे देवनार हा हवा प्रदूषणाचा कायस्वरूपी ‘हॉटस्पॉट’ ठरत असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले असून आरोग्यास अत्यंत हानिकारक असणाऱ्या पीएम.२.५ धूलिकणांची मात्र २०२४-२५ मध्ये देवनार व वरळी येथील सिद्धार्थ नगर परिसरात अधिक होती, असे नमूद करण्यात आले आहे.
