मुंबई : मुंबईतील ढासळत्या हवेच्या गुणवत्तेचा प्रश्न गंभीर बनला असून मुंबईतील बांधकाम प्रकल्प आणि पायाभूत सुविधा प्रकल्पांमुळे वायू प्रदूषण होत असल्याचेही स्पष्ट झाले आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेने वायू प्रदूषण नियंत्रण नियमावलीचे उल्लंघन करणाऱ्या बांधकामांना, प्रकल्पांना कारणे दाखवा, काम बंद नोटीसा बजावण्यात सुरुवात केली आहे. तर आता म्हाडाच्या मुंबई मंडळाने जागे होत वायू प्रदूषण रोखण्यासाठी, वायू प्रदूषण नियंत्रण नियमावलीचे कोठर पालन करण्यासाठी पुढाकार घेतला आहे.
मंडळाने ६०० बांधकाम प्रकल्पांना (म्हाडा वसाहत पुनर्विकास प्रकल्प आणि म्हाडा गृहनिर्माण) पत्र पाठवून नियमावलीचे पालन करण्यासह आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या निर्देश विकासक, कंत्राटदारांना दिले आहेत. तर वायू प्रदूषण नियंत्रण नियमावलीचे उल्लंघन झाल्याचे आढळल्यास काम बंद नोटीस बजावू, असा इशाराही पत्राद्वारे विकासक, कंत्राटदारांना दिला आहे.
मुंबईत वायू प्रदूषणाचा प्रश्न गंभीर बनला असून या प्रश्नी उच्च न्यायालयानेही चिंता व्यक्त केली आहे. तर पालिकेच्या कारभारावर ताशेरेही ओढले आहेत. तसेच कडक कारवाई करण्याचे आदेश पालिकेला दिले आहेत. या आदेशानंतर पालिका अधिकाऱ्यांकडून प्रकल्पस्थळी जाऊन पाहणी करून कारणे दाखवा नोटीसा वा काम बंद नोटीस देण्याच्या कामास वेग देण्यात आला आहे.
१ ते २४ डिसेंबरदरम्यान पालिकेने ५०२ कारणे दाखवा नोटीसा, तर १८७ काम थांबविण्याच्या नोटीसा बजावल्या आहेत पालिकेकडून कारवाई करण्यात आल्यानंतर आता मुंबई मंडळानेही वायू प्रदूषण रोखण्यासाठी पुढाकार घेतला आहे.
मुंबईत म्हाडाचे १०० हून अधिक अभिन्यास आहे. या अभिन्यासातील म्हाडा वसाहतीतील मोठ्या संख्येने इमारती जुन्या झाल्या असून दुरुस्तीच्या पलिकडे गेल्या आहेत. त्यामुळे अनेक इमारतींचा सध्या पुनर्विकास सुरु आहे. या पुनर्विकासाच्या कामामुळे तसेच म्हाडाच्या गृहनिर्माण प्रकल्पामुळे वायू प्रदूषण होऊ नये यासाठी आता मुंबई मंडळाने आवश्यक ती काळजी घेण्याचा निर्णय घेतला आहे.
मुंबई मंडळाने ६०० बांधकामांना (म्हाडा वसाहतींचा पुनर्विकास आणि म्हाडा गृहनिर्माण) पत्र पाठवून पालिकेच्या वायू प्रदूषण नियंत्रण नियमावलीचे कठोर पालन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तर सर्व कार्यकारी अभियंत्यांना प्रकल्प स्थळांची पाहणी करून नियमावलीचे उल्लंघन होत नाही ना, याची पाहणी करण्याची सूचना केल्याचे सूत्रांनी सांगितले. याविषयी मुंबई मंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना विचारले असता त्यांनी ६०० प्रकल्पांना पत्र पाठविण्यात आल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला. तर वायू प्रदूषण नियंत्रण नियमावलीचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास म्हाडाकडूनही काम बंदची कारवाई केली जाणार असल्याचेही सांगितले.
