मुंबई : काही महिन्यात मुंबई शहराच्या सरासरी हवा गुणवत्ता निर्देशांकात सुधारणा झाली असली तरीही शीव आणि देवनार येथील हवा प्रदूषणात मात्र वाढ झाली आहे. ‘समीर ॲप’वरील नोंदीनुसार काही दिवसांपासून येथील निर्देशांक ‘अतिधोकादायक’ आणि ‘मध्यम’ श्रेणीत नोंदवला जात आहे. दरम्यान, शीव येथे मंगळवारी सहा महिन्यांतील सर्वाधिक प्रदूषित हवेची नोंद झाली. येथील गुणवत्ता निर्देशांक ४०३ म्हणजेच ‘अतिधोकायदाक’ श्रेणीत असून या हवेत आरोग्यास हानिकारक असणाऱ्या नायट्रोजन डायऑक्साइडचे प्रमाण सर्वाधिक होते.

मुंबईत मागील काही वर्षांपासून हवा प्रदूषणात लक्षणीय वाढ झाली आहे. हिवाळ्यात मुंबईत सर्वाधिक हवा प्रदूषणाची नोंद होते, तर पावसाळ्यात हवा प्रदूषणात घट होते. या दिवसात बहुतांश हवा गुणवत्ता मापन केंद्रावर ‘चांगल्या’ श्रेणीतील हवेची नोंद होते. दरम्यान, मुंबईच्या सरासरी हवा गुणवत्ता निर्देशांकात मार्चपासून घट नोंदवली जात असून मे आणि जुलै महिन्यात समाधानकारक ते चांगल्या श्रेणीत हवेची नोंद झाली आहे. मात्र, हवेत प्रदूषके कायम असल्याचे अभ्यासकांचे मत आहे.

मुंबईतील वांद्रे – कुर्ला संकुल, शिवाजी नगर (गोवंडी), सिद्धार्थ नगर (वरळी), नेव्ही नगर (कुलाबा) आणि चेंबूर या हवा गुणवत्ता मापन केंद्रावर सातत्याने प्रदूषित हवेची नोंद होते. ‘समीर ॲप’च्या नोंदीनुसार या आठवड्यात देवनार येथे मागील दोन दिवस ‘मध्यम’ श्रेणीत हवेची नोंद झाली आणि शीव येथे प्रदूषित हवा नोंदली गेली. शीव येथे २६ जुलै रोजी हवा गुणवत्ता निर्देशांक ३७२, तर २७ जुलै रोजी ३९७ म्हणजेच ‘धोकादायक’ श्रेणीत, तर २८ जुलै रोजी ४०३ म्हणजेच ‘अतिधोकादायक’ श्रेणीत नोंद झाली.

गुणवत्ता मापन केंद्रात तांत्रिक बिघाड

मुंबईत पावसाळ्यात ‘धोकादायक’ ते ‘अतिधोकादायक’ श्रेणीत हवा निर्देशांक श्रेणी नोंदली जाणे शक्य नाही. शीव येथील स्वयंचलित हवा गुणवत्ता मापन केंद्रात तांत्रिक बिघाड झाल्याने चुकिच्या श्रेणीत हवेची नोंद झाली. आम्ही तेथील नोंदी थांबविण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. – सुजीत डोलम, प्रादेशिक अधिकारी (मुंबई), महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ