मुंबई : मुंबईतील हवा गुणवत्ता सुधारण्यासाठी तसेच रस्त्यांवरील धूळ आणि बांधकाम व पाडकामाच्या राडारोड्यामुळे होणाऱ्या प्रदूषणास प्रतिबंध करण्याच्या उद्देशाने महानगरपालिकेने रस्ते स्वच्छता व धूळ नियंत्रणासाठी विशेष मोहीम हाती घेतली आहे. या अंतर्गत गुरुवारी एकाच दिवसात ६९.५५ किलोमीटर लांबीच्या रस्त्यांची सखोल स्वच्छता करण्यात आली. त्यातून एकूण ३९.७५ टन धूळ आणि ११५ टन बांधकाम व पाडकाम राडारोडा गोळा करण्यात आला.
महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे यांच्या निर्देशांनुसार, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली आणि उप आयुक्त किरण दिघावकर यांच्या नेतृत्वात घनकचरा व्यवस्थापन आणि स्वच्छतेसाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहे. याच अनुषंगाने, मुंबईतील हवा गुणवत्ता राखण्यासाठी रस्ते स्वच्छता व धूळ नियंत्रणासाठी विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. त्या अंतर्गत महानगरपालिकेच्या २६ प्रशासकीय विभागांतील १४६ रस्त्यांवर स्वच्छता करण्यात येत आहे.
या मोहिमेत एकूण २९ मार्गांवर सुमारे ६९.५५ किलोमीटर अंतर परिसरात गुरुवारी स्वच्छता करण्यात आली आहे. यामध्ये एकूण ३९.७५ टन धूळ आणि ११५ टन बांधकाम व पाडकाम राडारोडा संकलित करण्यात आला. तसेच, त्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्यात आली. यासाठी महानगरपालिकेचे ५४१ स्वच्छता कर्मचारी, ४७१ स्वयंसेवक अविरतपणे कार्यरत होते. तसेच, १८ जेसीबी, २० डंपर, २१ मल्टीपर्पज मस्टींग मशीन, २१ मेकॅनिकल पॉवर स्वीपर, ६ वॉक-बिहाइंड ई-स्वीपर, ६ डिव्हायडर क्लीनिंग मशीन आदी अद्ययावत संयंत्रांचा वापर करण्यात आला.
या प्रमुख मार्गांवर स्वच्छता
या विशेष मोहिमेत मुंबईतील महत्त्वाच्या आणि मोठ्या वाहतूक मार्गांवर प्राधान्याने लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. यामध्ये वांद्रे-कुर्ला जोडमार्ग (बीकेसी कनेक्टर), सांताक्रूझ-चेंबूर जोड मार्ग, पूर्व आणि पश्चिम द्रुतगती महामार्ग, जोगेश्वरी-विक्रोळी जोड मार्ग, घाटकोपर-मानखुर्द मार्ग, स्वामी विवेकानंद मार्ग (एस. व्ही. रोड), लिंक रोड, कार्टर रोड आणि शीव – मानखुर्द मार्ग यांचा प्रामुख्याने समावेश आहे. या प्रमुख मार्गांशिवाय महानगरपालिकेच्या विविध प्रशासकीय विभागांतील अन्य रस्ते आणि परिसरात स्वच्छता व धूळ नियंत्रणाची कामे हाती घेण्यात आली आहेत.
धूळ व इतर कचरा हटविण्यावर भर
या मोहिमेअंतर्गत रस्त्यांची सखोल स्वच्छता, झाडलोट व स्क्रॅपिंग, रस्त्यांच्या कडेला साचलेली धूळ व गाळ हटविणे, दुभाजक, पदपथ, रस्त्याच्या कडेचा बांध (कर्ब स्टोन) व धूळप्रवण ठिकाणी पाण्याची फवारणी व मिस्टिंग तसेच जमा झालेल्या कचऱ्याची तातडीने उचल व योग्य विल्हेवाट यावर भर देण्यात येत आहे. तसेच यांत्रिक स्वच्छतेसोबतच मनुष्यबळाचाही वापर करून रस्त्यांवरील धूळ व इतर कचरा हटविण्यावर भर देण्यात येत आहे. विशेषतः धूळप्रवण ठिकाणी मिस्टिंग व आवश्यकतेनुसार पाण्याची फवारणी करून धूळ हवेत पसरण्याचे प्रमाण कमी करण्यासाठी उपाययोजना करण्यात येत आहेत.
