मुंबई : मुंबईतील हवेच्या गुणवत्तेत सुधारणा झाली असून बुधवारी समीर ॲपच्या नोंदीनुसार, शहराचा सरासरी हवा गुणवत्ता निर्देशांक ८९ इतका म्हणजेच ‘समाधानकारक’ श्रेणीत नोंदला गेला. त्यामुळे मुंबईकरांना स्वच्छ हवेचा अनुभव घेता आला. तसेच शहरातील दृश्यमानताही सुधारल्याने अनेक दिवसांनी मुंबईकरांना निरभ्र आकाशाचे दर्शन झाले.

मागील दोन महिन्यांपासून मुंबई आणि उपनरातील हवा प्रदूषणात वाढ झाली आहे. तसेच शहराचा सरासरी हवा गुणवत्ता निर्देशांक सातत्याने ‘मध्यम’ श्रेणीत नोंदला जात आहे. काही भागातील हवा गुणवत्ता निर्देशांक ‘वाईट’ श्रेणीत नोंदला जात होता. यात वांद्रे कुर्ला संकुल, वरळी, छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ आदी भागात सर्वाधिक प्रदूषित हवेची नोंद होत होती. मात्र, मंगळावारपासून शहरातील हवेच्या गुणवत्तेत काहीशी सुधारणा झाली असून हवा गुणवत्ता निर्देशांक ‘समाधानकारक’ श्रेणीत नोंदला जात आहे.

सध्या शहरात वाऱ्याचा वेग वाढला असून याचाही परिणाम हवेची गुणवत्ता सुधारण्यास होत असतो. मंगळवारी शहर आणि उपनगरातील बहुतांश भागातील हवा गुणवत्ता निर्देशांक ‘समाधानकारक’ श्रेणीत तर शीव येथील हवा ‘चांगल्या’ श्रेणीत नोंदली गेली. येथील हवा गुणवत्ता निर्देशांक ४० इतका होता. शहरातील एकूण २५ हवा गुणवत्ता मापन केंद्रांपैकी ७ केंद्रावर ‘मध्यम’ श्रेणीतील हवा नोंदली गेली. यात वांद्रे कुर्ला संकुल – १२१, चकाला (अंधेरी) – १२५, देवनार – १३२, घाटकोपर – ११७, कांदिवली पश्चिम – १०९, मालाड पश्चिम – १०७ तर शिवाजी नगर (गोवंडी) येथील हवा गुणवत्ता निर्देशांक १२३ इतका होता.

शहरातील दृश्यमानता सुधारली

मागील काही दिवसांपासून शहरात धुरकट वातावरण कायम होते. याचा परिणाम शहरातील आणि उपनरागरील दृश्यमानतेवर झाला होता. चार दिवसांपूर्वीही शहरातील धुरकट वातावरणात वाढ झाली होती. याचाही परिणाम हवेच्या गुणवत्तेवर होत असतो. मात्र, बुधवारी शहरातील हवेच्या गुणवत्तेत सुधारली असून दृश्यमानतेतही सुधारणा झाली आहे. यामुळे अनेक दिवसानंतर मुंबईकरांना निरभ्र आकाशाचे दर्शन झाले.

हवेची गुणवत्ता ठरविण्याचे निकष काय ?

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या निकषांनुसार, हवा गुणवत्ता निर्देशांक ०-५० दरम्यान ‘चांगली’, ५१-१०० दरम्यान ‘समाधानकारक’, १०१-२०० दरम्यान ‘मध्यम’, २०१-३०० दरम्यान ‘वाईट’, ३०१-४०० दरम्यान ‘अत्यंत वाईट’ आणि ४०० पेक्षा जास्त म्हणजे हवेची गुणवत्ता ‘अतिधोकादायक’ समजली जाते.