मुंबई : मुंबईत तीन दिवसांपासून हवेच्या गुणवत्तेत सुधारणा झाली असून साधारणपणे मागील एक-दीड महिन्यानंतर मुंबईकरांना निरभ्र आकाशाचे दर्शन झाले आहे. समीर ॲपवरील नोंदीनुसार, शनिवारी शहराचा सरासरी हवा गुणवत्ता निर्देशांक ६० इतका म्हणजेच ‘समाधानकारक’ श्रेणीत नोंदला गेला. यामुळे सध्या मुंबईकर स्वच्छ हवेचा अनुभव घेत असून अनेकांनी समाज माध्यमांवर आनंद व्यक्त केला आहे.

शहराचा सरासरी हवा गुणवत्ता निर्देशांक सातत्याने ‘मध्यम’ श्रेणीत, तर काही भागात ‘वाईट’ श्रेणीत नोंदला जात होता. तसेच मागील काही दिवसांपासून शहरात धुरकट वातावरण कायम असल्याने दृश्यमानता कमी झाली होती. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीतही हवा प्रदूषण हा मुद्दा चर्चेचा विषय ठरला होता. प्रशासकीय पातळीवरून अनेक उपाययोजना केल्या जात असल्या तरीही मागील काही दिवसांपासून हवेची गुणवत्ता ‘मध्यम’ श्रेणीत नोंदली जात होती. मात्र, मंगळावारपासून शहरातील हवेच्या गुणवत्तेत काहीशी सुधारणा झाली असून मागील तीन दिवसांपासून हवा गुणवत्ता निर्देशांक ‘समाधानकारक’ श्रेणीत नोंदला जात आहे. सध्या शहरात वाऱ्याचा वेग वाढला असून याचाही परिणाम तात्पुरता हवेची गुणवत्ता सुधारण्यात होत आहे.

पावसाळ्यानंतर मुंबईतील वाऱ्याची स्थिती बदलते, वेग मंदावतो. त्यामुळे हवेत साचलेली धूळ, प्रदूषके यांचा निचरा होत नाही. बाष्पामुळे धुलीकण हवेतच तरंगत राहतात. या नैसर्गिक कारणांबरोबच अनेक मानवनिर्मित कारणेही मुंबईच्या प्रदूषणात भर घालत असतात. सध्या शहरात वाऱ्याचा वेग वाढला आहे. यामुळे हवेची गुणवत्ता सुधारण्यास मदत झाली आहे. मुंबईत ताशी ४३ किलोमीटर वेगाने वारे वाहत असल्याचे निरीक्षण हवामान विभागाने शनिवारी नोंदविले. शहर आणि उपनगरात एकूण २७ हवा गुणवत्ता मापन केंद्रे असून त्यापैकी ७ केंद्रांवरील हवा ‘चांगल्या’ श्रेणीत नोंदली गेली. बोरिवली पूर्व येथील हवेत सर्वाधिक कमी प्रदूषण नोंदले गेले. येथील हवा गुणवत्ता निर्देशांक १९ इतका होता. तर बहुतांश भागातील हवा ‘समाधानकारक’ श्रेणीत नोंदली गेली.

समीर ॲपच्या नोंदीनुसार, जानेवारी महिन्यात केवळ आठ वेळाच हवा ‘समाधानकारक’ श्रेणीत नोंदली गेली होती. जानेवारी महिन्यातील सर्वाधिक प्रदूषित हवा ४ जानेवारी रोजी ( हवा गुणवत्ता निर्देशांक -१४० ) नोंदली गेली होती. फेब्रुवारी महिन्यात आतापर्यंत केवळ सहा वेळाच हवा ‘समाधानकारक’ श्रेणीत नोंदली गेली आहे. यात सर्वाधिक प्रदूषित हवेची नोंद ( १४५) ही २१ फेब्रुवारी रोजी झाली होती.

हवा प्रदूषणातून तात्पुरती सुटका

मुंबईत अनेक महिन्यानंतर निरभ्र आकाशाचे दर्शन झाल्याने मुंबईकरांनी समाजमाध्यमांवर आनंद व्यक्त केला आहे. अनेकांना निळ्या आकाशाची आणि विशेषतः समुद्रकिनाऱ्यावरील छायाचित्र काढण्याचा मोह आवरता आला नाही. मोकळ्या आणि स्वच्छ हवेबाबत मुंबईकरांनी समाधान व्यक्त केले.

मुंबईतील हवा स्वच्छ दिसत असली तरी हा बदल तात्पुरता असू शकतो. दीर्घकालीन सुधारणा करण्यासाठी बांधकामातील धूळ, वाहनांचे उत्सर्जन आणि औद्योगिक प्रदूषण यावर सातत्याने नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे.- भगवान केसभट, पर्यावरण अभ्यासक