मुंबई : मागील काही दिवसांपासून मुंबई शहराचा सरासरी हवा गुणवत्ता निर्देशांकात (एक्यूआय) सुधारणा होत असून मुंबई आणि उपनगरातील नागरिकांना दिलासा मिळत आहे. मात्र ‘समीर’ ॲपच्या नोंदींनुसार मुंबईच्या काही भागात सातत्याने प्रदूषित हवेची नोंद होत असल्याने या भागातील नागरिकांना वाढत्या उष्णतेसह हवा प्रदूषणाचाही सामना करावा लागत आहे.

मुंबईतील हवा प्रदूषणात काहीशी सुधारणा झाली असून सरासरी हवा गुणवत्ता निर्देशांकात सुधारणा झाली असल्याने मुंबईकरांना हवा प्रदूषणापासून काहीसा दिलासा मिळाला होता. ‘समीर’ ॲपच्या नोंदींनुसार गुरुवारी दुपारी मुंबईचा सरासरी हवा गुणवत्ता निर्देशांक ८० इतका म्हणजेच ‘समाधानकारक’ श्रेणीत नोंदला गेला.

या भागात सर्वात प्रदूषित हवा

शहराचा सरासरी हवा गुणवत्ता निर्देशांक ‘समाधानकारक’ श्रेणीत असला तरीही शहरातील शीव येथील हवा गुणवत्ता थेट ‘अत्यंत वाईट’ या श्रेणीत नोंदला जात आहे. येथील हवा गुणवत्ता निर्देशांक गुरुवारी दुपारी ३०८ इतका होता. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या निकषांनुसार या श्रेणीतील हवा गुणवत्ता निर्देशांक ‘अत्यंत वाईट’ मानला जातो. बुधवारीही शीव परिसरात हवा गुणवत्ता निर्देशांक २१६ इतका म्हणजे ‘वाईट’ श्रेणीत नोंदला गेला होता.

येथील हवेत आरोग्यास अत्यंत हानिकारक असणाऱ्या पीएम. २.५ आणि पीएम १० चे प्रमाण सर्वाधिक आहे. यामुळे नागरिकांना श्वसनासंबंधी समस्यांचा सामना करावा लागतो, तसेच यामुळे नागरिकांमध्ये आरोग्यविषयक समस्याही निर्माण होतात. ‘समीर’ ॲपच्या नोंदींनुसार याआधी ७ जुलै २०२४ रोजी शीव येथे ‘अत्यंत वाईट’ हवेची नोंद झाली होती. त्यानंतर शीव येथे अनेकदा हवा गुणवत्ता ‘वाईट’ श्रेणीत नोंदला गेला होता. मात्र, आत पुन्हा हवा गुणवत्ता निर्देशांक ‘अत्यंत वाईट’ श्रेणीत पोहोचल्याने चिंता व्यक्त होत आहे.

इतर भागातील स्थिती काय ?

‘समीर’ ॲपच्या नोंदींनुसार गुरुवारी दुपारपर्यंत मुंबई शहर आणि उपनगरातील बहुतांश भागात ‘समाधानकारक’ ते ‘चांगली’ या श्रेणीत हवेची नोंद झाली. कांदिवली पूर्व आणि विलेपार्ले पश्चिम येथील हवा ‘चांगली’ श्रेणीत नोंदली जात आहे. सध्या मुंबईत ३० ते ३१ किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहत आहेत. वाऱ्यांच्या वेगाचाही परिणाम हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी होत असतो.

हवेची गुणवत्ता ठरविण्याचे निकष काय ?

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या निकषांनुसार, हवा गुणवत्ता निर्देशांक ०-५० दरम्यान ‘चांगली’, ५१-१०० दरम्यान ‘समाधानकारक’, १०१-२०० दरम्यान ‘मध्यम’, २०१-३०० दरम्यान ‘वाईट’, ३०१-४०० दरम्यान ‘अत्यंत वाईट’ आणि ४०० पेक्षा जास्त म्हणजे हवेची गुणवत्ता ‘अतिधोकादायक’ समजली जाते.