मुंबई : गेल्या आठवड्यात मुंबईमध्ये बहुतांश ठिकाणी हवेचा दर्जा ‘चांगला’ ते ‘समाधानकारक’ श्रेणीत नोंदला गेला होता. मुंबईत सोमवारपासून पावसाने ओढ दिली आहे. परिणामी, काही भागातील हवेचा दर्जा खालावला आहे. समीर ॲपच्या नोंदीनुसार, शिवाजीनगर आणि देवनार येथील हवा मंगळवारी ‘मध्यम’ श्रेणीत नोंदली गेली. काही दिवसांपूर्वी येथे समाधानकारक श्रेणीत हवा नोंदली जात होती.
मागील काही दिवस मुंबईची हवा ‘चांगल्या’ श्रेणीत नोंदली जात होती. दिवाळीदरम्यान सुरू झालेला पाऊस सोमवारी थांबला. त्यामुळे आतापर्यंत मुंबईमधील सर्वच भागातील हवेच्या दर्जात सुधारणा झाली होती. मात्र, आता पावसाने ओढ दिली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा हवेचा दर्जा खालावला आहे. समीर ॲपच्या नोंदीनुसार, मंगळवारी शिवाजीनगर येथील हवा निर्देशांक १०६ आणि देवनार येथील हवा निर्देशांक १०३ इतका होता. म्हणजेच येथील हवा ‘मध्यम’ श्रेणीत नोंदली गेली होती. येथे पीएम २.५ ची मात्रा अधिक होती. ‘मध्यम’ श्रेणी घातक नसली तरी हळूहळू येथील हवा गुणवत्ता निर्देशांक खालावण्याची दाट शक्यता आहे. दरम्यान, या परिसरात मोठ्या प्रमाणात विकासकामे सुरू आहेत. तसेच बांधकामाच्या ठिकाणी आवश्यक त्या उपाययोजना न केल्याने हवेत धूळ पसरण्याचे प्रमाण या परिसरात अधिक आहे. राडारोड्याची अवैध वाहतूक, तसेच कचराभूमीमधील कचरा जाळण्याचे वाढते प्रमाण यामुळे या भागात सतत प्रदूषण वाढत आहे. याअगोदरही अनेकदा शिवाजी नगरमधील हवेची ‘मध्यम’ ते ‘वाईट’ श्रेणीत नोंद झाली होती.
केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या निकषांनुसार हवा गुणवत्ता निर्देशांक ० – ५० दरम्यान ‘चांगला’, ५१ – १०० दरम्यान ‘समाधानकारक’, १०१ – २०० दरम्यान ‘मध्यम’, २०१ – ३०० दरम्यान ‘वाईट’, ३०१ – ४०० दरम्यान ‘अतिवाईट’ आणि ४०० पेक्षा जास्त म्हणजे हवेची गुणवत्ता ‘अतिधोकादायक’ समजली जाते.
पीएम २.५ म्हणजे काय
हवेतील पीएम २.५ हे धुलीकण अतिघातक आहेत. हे कण श्वास घेताना सहज नाक आणि तोंडावाटे शरीरात प्रवेश करतात. हे धूलीकण हृदयविकाराचा झटका, दमा तसेच श्वसनाच्या इतर समस्या निर्माण करतात. बांधकामस्थळी, रस्त्यावरील धूळ, डिझेल, वाहन, कारखान्यांतील उत्सर्जन यामुळे प्रदुषण होते.
इतर भागातील स्थिती काय
समीर ॲपच्या नोंदीनुसार, अनेक भागात मंगळवारी ‘चांगली’ ते ‘समाधानकारक’ हवेची नोंद झाली. यामध्ये भायखळा येथील हवा निर्देशांक ३६, चेंबूर ४७, कुलाबा २८, भांडूप ४१, माझगाव ३७ आणि वरळी ३४ इतका होता. म्हणजेच येथे ‘चांगल्या’ हवेची नोंद झाली. तर उर्वरित भागातील हवा ‘समाधानकारक’ श्रेणीत नोंदली गेली होती.
