मुंबई : मुंबई शहरात दिवसेंदिवस हवा प्रदूषणात वाढ होताना दिसत आहे. ‘समीर’ ॲपनोंदीनुसार, मंगळवारी मुंबईतील सरासरी हवा गुणवत्ता निर्देशांक दुपारपर्यंत ११२ इतका म्हणजेच ‘मध्यम’ श्रेणीत नोंदला गेला. तसेच शहरातील इतर बहुतांश भागातील हवा ‘मध्यम’ श्रेणीत नोंदली जात असून अनेक भागात आरोग्यावर परिणाम करणाऱ्या पीएम २.५ आणि पीएम १० चे प्रमाण सर्वाधिक आहे.
शहरातील हवा प्रदूषण कमी करण्याच्या उद्देशाने प्रशासन पातळीवर विविध प्रयत्न केले जात असले तरीही दिवसेंदिवस हवा प्रदूषणात वाढ होताना दिसत आहे. ‘समीर’ ॲपनोंदीनुसार, वांद्रे – कुर्ला संकुलातील हवा मंगळवारी पहाटेपासूनच ‘वाईट’ श्रेणीत नोंदली जात असून येथील हवा निर्देशांक दुपारी २१७ इतका नोंदला गेला. यामुळे शहरातील सर्वाधिक प्रदूषित हवा या परिसरात असल्याचे दिसून येत आहे. येथील हवेत आरोग्यास अत्यंत धोकादायक ठरणाऱ्या पीएम २.५ चे प्रमाण सार्वधिक आहे.
पीएम २.५ ची पातळी धोकादायक का ?
पीएम २.५ (PM2.5) म्हणजे हवेत अतिशय सूक्ष्म कण असतात. ज्यांचा व्यास २.५ मायक्रोमीटर किंवा त्याहून कमी असतो. हे कण श्वसनामार्गे थेट शरीरात प्रवेश करू शकतात. यामुळे फुफ्फुसांचे आणि श्वसनाने आजार होऊ शकतात. तसेच हृदयविकार आणि उच्च रक्तदाब यांसारखे आजारही होऊ शकतात. मुंबई शहरातील या कणांचे प्रमाण काही ठिकाणी केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या २४ तासांसाठी ठरवून दिलेल्या मानकापेक्षा जास्त असून जागतिक आरोग्य संघटनेच्या मार्गदर्शक तत्वांपेक्षा अनेक पटीने अधिक आहे.
वाहने, उद्योग व कारखाने, शहरात सुरू असणारे बांधकाम प्रकल्प, कचराभूमी या आणि इतर अनेक स्रोतांमधून हे सूक्ष्म कण हवेत पसरतात. र पीएम १० (PM10) म्हणजे हवेत असलेले धुळीचे आणि प्रदूषणाचे कण, ज्यांचा व्यास १० मायक्रोमीटर किंवा त्यापेक्षा कमी असतो. हे कण पीएम २.५ पेक्षा मोठे असले तरीही आरोग्यासाठी हानिकारक असतात. यामुळे नाक, घसा आणि श्वसननलिकेसंबंधी आरोग्याच्या समस्या निर्माण होतात. तसेच खोकला, श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो.
इतर भागातील स्थिती काय ?
सिद्धार्थ नगर (वरळी) येथील हवा निर्देशांक मंगळवारी दुपारपर्यंत ‘मध्यम’
श्रेणीत म्हणजेच १३९ नोंदला गेला, तर शीव
११४, गोवंडी शिवाजी नगर १२०, नेव्ही नगर (कुलाबा ) १२८, मालाड पूर्व १३६ कुर्ला ११२, कांदिवली पश्चिम १०३, घाटकोपर ११७, देवनार १२१, चकाला (अंधेरी) ११२, तर विलेपार्ले, मुलुंड पश्चिम, माझगाव, भांडुप, कांदिवली पूर्व, कुलाबा, चेंबूर, भायखळा आणि बोरिवली पूर्व येथील हवा ‘समाधानकारक’ श्रेणीत नोंदली गेली.
