मुंबई : मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर एआय एअरपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड (एआयएएसएल ) च्या कर्मचाऱ्यांनी सोमवारी वेतनवाढ तसेच इतर मागण्यांसाठी अचानक आंदोलन पुकारल्याने विमानतळावर गोंधळ निर्माण झाला. त्याचा परिणाम विमानसेवेवर होऊन मुंबईहून उड्डाण करणाऱ्या सुमारे १५ विमानांना दीड तासांपासून ते दोन तासांपर्यत उशीर झाला. त्याचा मोठा फटका प्रवाशांना बसला.
कर्मचाऱ्यांनी अचानक पुकारलेल्या या संपामुळे विमानतळावरील अनेक सेवा ठप्प झाल्या. विमानतळावरील या सेवा पुरविण्यात या कर्मचाऱ्यांच्या मोठा सहभाग असतो. या संपामुळे केवळ विमानांची उड्डाणेच उशिराने झाली नाहीत तर काही विमाने विमानतळावर उतरल्यानंतरही प्रवाशांना सुमारे तासभर विमानातच बसवून ठेवण्यात आले होते. एअर इंडियाचे हैदराबाद ते मुंबई विमान सकाळी पावणे बाराच्या सुमारास विमानतळावर उतरले होते. मात्र, त्यानंतर प्रवाशांना बराच वेळ विमानातच थांबवून ठेवण्यात आले. त्यांनतरही प्रवाशांना त्यांचे सामान मिळण्यास अडचणी आल्या. तसेच मुंबईहून डेहराडूनकडे जाणाऱ्या एआय ४३१ या विमानाचे उड्डाणही उशिरा झाले. प्रवासी सकाळपासून बोर्डिंग गेटवर प्रतीक्षा करत होते. मात्र, याबद्दल वेळेत कोणतीही माहिती देण्यात आली नाही, असे सांगून प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली.
एआयएएसएल या संस्थेकडून संस्था एअर इंडिया आणि एअर इंडिया एक्स्प्रेससह अनेक देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय विमान कंपन्यांना विमानतळावरील सेवा पुरविल्या जातात. या संस्थेकडून देशभरातील अनेक विमानतळांवर सेवा दिली जाते. कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या आंदोलनाचा परिणाम ८० हुन अधिक विमान कंपन्यांच्या कामकाजावर झाल्याचे समजते आहे. या संपूर्ण गोंधळानंतर एअर इंडियाकडून एक निवेदन प्रसिद्ध करण्यात आले. यात विमानतळावरील सेवा पुरविणाऱ्या एका त्रयस्थ संस्थेच्या अचानक पुकारलेल्या आंदोलनामुळे एअर इंडियाच्या विमान सेवेवर परिणाम झाल्याबद्दल दिलगिरी व्यक्त करण्यात आली. तसेच त्यांनतर एआयएएसएल प्रशासनाने कर्मचाऱ्यांशी चर्चा करून त्यांना कामावर परतण्याचे आवाहन केले होते. कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर व्यवस्थापनाने विचार करण्याचे आश्वासन दिल्यांनंतर कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतला. मात्र, अचानक पुकारलेल्या या आंदोलनामुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला.
