मुंबई : देशातील अत्यंत व्यस्त हवाई क्षेत्रांपैकी एक असलेल्या मुंबई विमानतळावरील हवाई वाहतूक नियंत्रण कर्मचाऱ्यांनी, हवाई वाहतूक ऑटोमेशन सिस्टीममध्ये नव्याने बसवलेल्या डिस्प्ले उपकरणांबाबत चिंता व्यक्त केली आहे. हे व्यावसायिक टीव्ही स्क्रीन सतत जवळून पाहिल्यामुळे नियंत्रकांना शारीरिक त्रास होत असून यामुळे विमान उड्डाणांच्या सुरक्षेला मोठा धोका निर्माण होऊ शकतो, असा दावा हवाई वाहतूक नियंत्रण अधिकाऱ्यांनी केला आहे.

नवी सिस्टीम पूर्णपणे कार्यान्वित होण्यापूर्वी ऑपरेशन्स कंट्रोल डेस्कवर बसवलेले हे ४२ इंचाचे व्यावसायिक टेलिव्हिजन मॉनिटर्स हटवून त्याऐवजी मानक आणि उच्च-अचूकतेचे रडार डिस्प्ले बसवावेत, अशी मागणी ‘एयर ट्रॅफिक कंट्रोलर्स गिल्ड (इंडिया)’ने भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या (एएआय) वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे औपचारिक निवेदनाद्वारे केली आहे.

नव्या सिस्टीमची चाचणी; युनियनचा पाठपुरावा

हा संपूर्ण वाद ‘इंदिरा’ एअर ट्रॅफिक मॅनेजमेंट ऑटोमेशन सिस्टीमच्या सुरू असलेल्या अंमलबजावणीशी संबंधित आहे. ही सॉफ्टवेअर सिस्टीम सध्या अंतिम मंजुरीपूर्वी अत्यंत महत्त्वाच्या ‘शॅडो ऑपरेशन्स’ आणि चाचणीच्या टप्प्यातून जात आहे. या टप्प्यात नियंत्रक प्रत्यक्ष हवाई वाहतुकीसोबत या नव्या सिस्टीमची चाचणी घेत आहेत. या समस्येबाबत १० ऑगस्टला एटीसी गिल्डचे प्रादेशिक सचिव मुकेश यांनी गिल्डच्या राष्ट्रीय नेतृत्वाला पाठवलेल्या पत्राद्वारे लक्ष वेधले होते. यानंतर २८ ऑगस्टला युनियनचे राष्ट्रीय सरचिटणीस प्रभाकर प्रभात यांनी एएआय अध्यक्षांकडे हे प्रकरण अधिकृतपणे लावून धरले.

डोळ्यांवर ताण, मानेचे विकार

सततच्या मॉनिटरिंगदरम्यान अधिकाऱ्यांना विमानांचे लेबल्स, उड्डाणाचा मार्ग, इशारे आणि सुरक्षिततेचे अलर्ट यांवर सातत्याने बारीक लक्ष ठेवावे लागते. शॅडो ऑपरेशन्समध्ये सहभागी असलेल्या नियंत्रकांनी डोळ्यांवर ताण येणे, डोळे सुकणे, डोकेदुखी यासारखा शारीरिक त्रास होत असल्याचे सांगितले. तसेच अगदी जवळून ४२ इंचाच्या मोठ्या स्क्रीनवर सतत मान हलवावी लागत असून मान दुखण्याचा त्रास होत आहे.

…तर उड्डाण सुरक्षेचा प्रश्न

मुंबईचे हवाई क्षेत्र अत्यंत जटिल असून येथे एरिया, अप्रोच, एरोड्रोम आणि ओशनिक क्षेत्रांमधून मोठी हवाई वाहतूक हाताळली जाते. डिस्प्लेमधील विलंब आणि अस्पष्ट दृश्य संकेतांमुळे कर्मचाऱ्यांचा मानसिक ताण वाढत असल्याबाबत गिल्डने भर दिला. जास्त वाहतुकीच्या वेळी किंवा खराब हवामानात विमानांचे टॅग किंवा एकमेकांमधील अंतर दर्शवणारे संकेतक वाचण्यास उशीर झाल्यास मानवी चुकीची शक्यता वाढू शकते आणि उड्डाण सुरक्षेचा मोठा प्रश्न निर्माण होऊ शकतो.