मुंबई : मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर प्रवाशांच्या सामानामधील (बॅगेज) सोन्याचे दागिने, रोकड आणि मौल्यवान वस्तू चोरीला जाण्याच्या घटना घडत आहेत. जानेवारी ते ऑगस्टदरम्यान सहार पोलीस ठाण्यात असे १० गुन्हे दाखल आहेत. दरम्यान, या प्रकरणातील एकाही चोराचा अद्याप शोध लागलेला नाही.

मुंबई विमानतळ देशातील दुसऱ्या क्रमाकांचे सर्वात व्यस्त विमानतळ आहे. दररोज सुमारे दीड ते पावणे दोन लाख प्रवासी ये-जा करतात. मात्र येथील गर्दीचा फायदा घेऊन चोर मौल्यवान सामानावर डल्ला मारत आहेत. २९ जुलै रोजी एक महिला प्रवासी एअर इंडियाच्या विमानाने मुंबईहून चेन्नईला गेली. चेन्नईला पोहोचल्यानंतर बॅगमधून ४९ हजार रुपयांच्या वस्तू गहाळ झाल्याचे महिलेच्या लक्षात आले. महिलेने पुन्हा मुंबईत आल्यानंतर सोमवारी सहार पोलीस ठाण्यात याबाबत रीतसर तक्रार दाखल केली. मुंबईच्या दोन्ही विमानतळांवर २०२४ पासून दोन डझनांहून अधिक चोऱ्या झाल्या आहेत. परंतु एकही प्रकरण अद्याप उघडकीस आलेले नसून चोरही पकडला गेलेला नाही.

सहार पोलीस ठाण्यात चोरीच्या १० प्रकरणांचा तपास सुरू आहे. गुन्ह्यांचा माग काढण्यासाठी विमानतळ प्राधिकरणाकडून सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील चित्रण मागितले आहे. विमानात चढवण्यापूर्वी प्रवाशांच्या सामानातील मौल्यवान वस्तू ओळखून चोरण्यासाठी स्कॅनर वापरला जात आहे का याचा तपास सुरू आहे. – मनोज चाळके, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सहार पोलीस ठाणे</strong>

चोरीच्या गुन्ह्यांचा तपशील

– चेन्नई विमानतळावर सीसीटीव्हीचे चित्रीकरण तपासले असता सामानाशी छेडछाड झाली नसल्याचे आढळले. त्यामुळे वस्तू मुंबई विमानतळावरूनच चोरीला गेल्याचे तक्रारदारांनी म्हटले आहे. विमानात बॅगा ठेवल्यानंतर सोन्याचे कानातले, एक अंगठी आणि एक चांदीचे पैंजण असे ४९ हजार रुपयांचे चोरले गेले.

– जून महिन्यात कपडे, मेकअप सेटसह इतर काही सामान हरवल्याची तक्रार एका विद्यार्थिनीने केली होती. जालना पोलिसांनी दोन आठवड्यांपूर्वी हे प्रकरण पुढील तपासासाठी मुंबईला वर्ग केले. यामुळे २ ऑगस्ट रोजी सहार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

– फेब्रुवारीत स्पाईस जेटच्या दिल्ली-मुंबई प्रवासादरम्यान एका ४२ वर्षीय व्यावसायिकाच्या सामानातून दीड लाख रुपये चोरीला गेल्याप्रकरणी पवई पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला.

– जूनमध्ये ए. डी. जैन हे दिल्लीहून मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरले असता लॅपटॉप बॅगमधून पत्नीचे ५.५ लाख रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने चोरल्याचे त्यांच्या लक्षात आले. या प्रकरणी शिवाजी पार्क पोलिसात गुन्हा दाखल आहे.

– एप्रिल महिन्यात कोचीहून मुंबईला आलेल्या नर्सचे १.२५ लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरीला गेले. दागिन्याची हँडबॅग लगेज कंपार्टमेंटमध्ये ठेवली होती.

– नवी मुंबईतील ६३ वर्षीय निवृत्त व्यक्ती कोलकाताहून विमानाने मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरले. त्यावेळी त्यांच्या शर्टच्या खिशातून आयफोन चोरीला गेला. तर एका तासात तीन बँक खात्यांमधून १० व्यवहार केल्याचे उघड झाले.